Menu
Log in


Log in


कोजागिरी पौर्णिमा (प्रिया आपटे)

31 Oct 2020 8:39 AM | Amol Sawarkar (Administrator)

दसरा आणि दिवाळी दरम्यान येणारी कोजागिरी पौर्णिमा म्हणजे खास मित्रमंडळी जमुन गप्पांच्या फड रंगवत रात्र जागविण्याचे एक चांगले निमित्त !!

कोजागिरी पौर्णिमेचा उत्सव म्हणजे रात्री दुधात चंद्राचे प्रतिबिंब पाहून त्याचा नैवेद्य दाखवणे आणि मग ते दूध पिणे हे सर्वसाधारणपणे आपल्याला माहितच असते. पण त्याबाबतची इतर माहितीही तेवढीच बोधक आणि रंजक आहे बरं !

हा सण अश्विन पौर्णिमेला साजरा करतात. हि शरद ऋतूत येते म्हणून हिला शरद पौर्णिमा असे ही म्हणतात.

या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वांत जवळ, म्हणजे कोजागिरी पर्वतालगत आलेला असतो. त्यामुळे या पौर्णिमेला ‘कोजागिरी पौर्णिमा’ असे म्हंटले जाते आणि म्हणूनच हयादीवशी चंद्र दिसतोही मोठा आणि त्याचा प्रकाश ही तितकाच जाणवण्या इतका आल्हाददायी असतो.

या दिवशी नवान्न (नवीन पिकवलेल्या धान्याने) जेवण करतात. श्री लक्ष्मी आणि ऐरावतावर बसलेला इंद्र यांची रात्री पूजा करतात. पूजा झाल्यावर पोहे आणि नारळाचे पाणी देव आणि पितर यांना समर्पित करुन नंतर नैवेद्य म्हणून ग्रहण करतात. हा प्रसाद आपल्याकडे आलेल्या सर्वांना देतात. हिला नवान्न पौर्णिमा म्हणूनही ओळखतात. 

शरद ऋतूतल्या पौर्णिमेच्या स्वच्छ चांदण्यात चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवुन आणि चंद्राची किरणे त्या दुधाला स्पर्शून गेल्यावर त्या दुधाचे प्रसाद म्हणून ग्रहण करण्याची प्रथा आहे. ह्या मागचे अजूनही एक कारण म्हणजे चंद्राच्या प्रकाशात एकप्रकारची शक्ती असते जी आरोग्यदायी असते असे म्हटले जाते.

चंद्र हा शीतल आणि आल्हाददायक गोष्टींचे प्रतिक असल्याने त्याची पूजा करणाऱ्यांनाही चंद्रासारखी शीतलता मिळते असेहि मानले जाते.

असेही म्हणतात कि आज रात्री लक्ष्मी " को जागर्ति ?" असे म्हणत चंद्रमंडलातून भूतलावर येते आणि जो जागा असेल त्याच्यावर संतुष्ट होऊन आशीर्वाद  देते :-)

आणि म्हणून की काय या रात्री जागरण करत, आनंदी वातावरणात करमणुकीसाठी निरनिराळे बैठे खेळ खेळले जातात.

भारतातील बहुतांश ठिकाणी शरद पौर्णिमेला लक्ष्मी नारायणाचे पूजन करण्याची प्रथा प्रचलित आहे. या दिवशी देवी नारायणांसह गरुडावर आरुढ होऊन पृथ्वीतलावर येते. लक्ष्मी देवीचे दर्शन घेण्यासाठी अनेक देवता स्वर्गातून पृथ्वी येतात, अशी लोकमान्यता आहे. 

लक्ष्मी आणि इंद्र या दोन देवतांना पृथ्वीवर तत्त्वरूपाने अवतरण्यासाठी चंद्र आग्रहात्मक आवाहन करतो. लक्ष्मी ही आल्हाददायक आणि इंद्र ही शीतलतादायक देवता आहे. यादिवशी वातावरणात या दोन्ही  देवता तत्त्वरूपाने येत असल्याने आणि त्यांचे तत्त्व अधिक प्रमाणात कार्यरत असल्याने त्यांची पूजा केली जाते. 

आपणही जागवू या कोजागिरी पौर्णिमा, घेऊ या लक्ष्मीचा आशीर्वाद, मसाला दूध हि पिऊ या पण ह्या वर्षी अगदी घरच्या घरीच. सर्वजण मिळून प्रार्थनाकरू या की पुढच्यावर्षीची 

कोजागिरी पौर्णिमा ही गायन, वादन, नृत्य आणि मित्रमैत्रिणीं यांच्या साथीने साजरी करता येऊ दे.

माहिती संकलन 

प्रिया आपटे