साधारणपणे जुलै-ऑगस्ट महिना आला कि मनात चुळबुळ होऊ लागते .गणपती बाप्पांची चाहूल लागते .आम्ही स्वित्झर्लंड ला एप्रिल १९८९ ला पोहोचलो.ऑगस्ट आला आणि गणेश उत्सवा च काय करायचे याचा मनात नाच सुरु झाला .मी दिल्लीमध्ये १९७० ते १९८४ या चौदा वर्षात आम्ही तेथील मराठी मंडळाचे सभासद होतो .त्यामुळे मराठी समारंभ बऱ्यापैकी माहित होते.पण स्वित्झर्लंड ची गोष्ट वेगळी होती. पण भक्तच देवाला शोधात नाही तर देव सुद्धा भक्ताला शोधात असतो.माझाही बाबतीत असेच काहीसे झाले.समस्या आल्या त्या त्यांचे समाधान घेऊनच आल्या.
बाझल चा एक तिशीतला तरुण स्विस नागरिक माझ्याकडे व्हिसा साठी आला.त्याचा पासपोर्ट केवळ १२ दिवसच व्हॅलिड होता .त्याला दिल्ली ला त्वरित जायचे होते . माझ्याअसिस्टंट ने त्याला नाही म्हणून व्हिसा नाकारला .पण तो मला भेटायला आला आणि सर्व चित्र बदलून गेलं. मी त्याला सांगितले कि जर तू मला दिल्ली हुन गणेशमूर्ती आणून देशील तर मी तुला १० दिवसांचा व्हिसा देईन तो एकदम कबूल झाला .मी त्याला दिल्लीतील मूर्ती मिळण्याचे दोन पत्ते दिले .
चार दिवसांनी मला त्याचा दिल्ली हुन फोन आला कि मूर्ती मिळाली आहे,त्याच बरोबर आमचे पूर्ण कुटुंब कामाला लागले.मी सरकारी बाबू असल्याने
सण घरगुती पण सगळ्यांना बोलवायचे ठरले. गणेश उत्सवात साधारण एक वीकएंड येतो . मग आम्ही ठरवलं कि शुक्रवारी संध्याकाळी आरती साठी दूतावासा मधल्या सर्व स्टाफ ला बोलवायचं, शनिवारी बर्न मधल्या सर्व भारतीयांना बोलवायचे आणि रविवारी सकाळी १० वाजल्या पासून संध्याकाळी विसर्जन होईपर्यंत स्वित्झर्लंड मधल्या सर्व मराठी मंडळींना बोलवायचे.
आणि आमच्या गणपतींचे भाग्य पहा आमंत्रणा प्रमाणे सर्व पाहुणे मंडळी तर आलीच पण प्रत्येक जण फुले किंवा प्रसाद घेऊन आला श्री.नागरथ यांनी तर मुंबई हुन १२५ मोदक मागवले . सौ.विद्या तांबे ,सौ.ललिता सुखटणकर आणि सौ.बेला कुलकर्णी यांनी भजनं आणि भावगीते म्हणून सगळ्यांचा आनंद द्विगुणीत केला. काही मराठी लोकं सेंट.गॅलेन व जिनिव्हा ची प्रथमच भेटली..
माणूस समारंभ प्रिय प्राणी आहे. आणि त्यामुळेच माझ्या हातून थोडी सेवा झाली.पहा श्रीगणेश आपली सेवा करून घेतो.
मुकुंद कोटणीस