आज देवशयनी म्हणजेच आषाढी एकादशी. चातुर्मासाची सुरुवात. आषाढी एकादशीच्या शुभेच्छा (?!?) वगैरे देण्यासाठी हा लेखनप्रपंच नाही!
मला नेहेमी पडलेले प्रश्न - इंग्रजांसारख्या परकीयांचे काय मत होते वारी व वारकऱ्यांबद्दल? त्यांनी कधी पंढरी व पंढरपूर ह्याबद्दल एेकले तरी होते का? आपण वाचतो त्या इतिहासाप्रमाणे आपल्यावर जुलूम वगैरे करताना त्यांना वेळ मिळत होता का ह्या गोष्टी करायला? केली शोधाशोध आणि ब्रिटीश लायब्ररीत मागच्या शनिवारी एक खास हस्तलिखित पहायला गेलो होतो.
हे हस्तलिखित आहे विल्यम एर्स्किन ह्या माणसाचे. कसले हे जाणून घ्यायच्या आधी विल्यमबद्दलची माहिती बघूयात. विल्यमचा जन्म १७७३ चा स्कॉटलंडमधील एडींबरोमधला. कायद्यात डॉक्टरेट मिळून तो ईस्ट इंडीया कंपनीत कामाला लागला व १८०४ मध्ये मुंबईत आला. भारताबद्दल आधीपासून त्याला कुतूहल होतेच पण इथे आल्यावर त्याला भारतीय संस्कृतीबद्दल फार गोडी वाटायला लागली. इतकी की तो काही भारतीय भाषा (मराठी धरून!) शिकला आणि पुढे स्वत:च्या खर्चाने वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तेथील चालीरिती समजावून घ्यायला जाऊ लागला. १८०९ मध्ये ह्याचे मद्रासमध्ये लग्न झाले - त्याचा रिपोर्टींग बॉस सर जेम्स मॅकिंतोश ह्याच्या मुलीशी. (सर जेम्स हा इंग्लंडचा राजा तिसरा जॉर्ज, फ्रान्सचा नेपोलियन, आणि पुण्याचे दुसरे बाजीराव पेशवे ह्या सगळ्यांच्या दरबारात जाऊन आलेला होता. आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे - पेशवा, त्याचा दरबार आणि चालीरिती ह्या इंग्लंड वा फ्रान्सच्या दरबारापेक्षा उजव्या होत्या - असे सर जेम्सच्या आत्मवृत्तात नमूद आहे!)
पुन्हा विल्यमकडे वळूया. विल्यम एकदा आषाढ महिन्यात पुण्याकडे गेला असताना त्याला वारी आणि पंढरीबद्दल समजले. कोण आहेत हे लोक? कुठे जातात चालत? पंढरपूरच का? हे प्रश्न त्याला सतावू लागले. मग काय लागली स्वारी कामाला. चौकश्या करवून ह्या पठ्ठ्यानं सरळ 'पंढरी माहात्म्या'ची एक प्रत मिळवली आणि स्वत:च बसून त्याचं इंग्रजी भाषांतर करून टाकलं. आणि हे कमी की काय म्हणून त्याने त्यावर इंग्रजीत टीकायुक्त हस्तलिखित विवेचनही लिहून ठेवलेले आहे - 'Analysis of the Pundari Mahutm' ह्या नावाने - आणि हीच ती प्रत ब्रिटीश लायब्ररीत अगदी जपून ठेवलेली आहे.
त्याने किती नीट व मन लावून काम केले आहे हे समजून घेण्यासाठी पुढच्या अजून एका पानाचा फोटो पहा. 'बुडाली माझी अर्थे - बुडाली माझी स्वार्थे' ह्या माहात्म्यातल्या वाक्याचे त्याने अतिशय सुंदर विवेचन केलेले आहे. भारतीय असता तर पंढरी माहात्म्यावर निरुपणासह उत्तम किर्तन करु शकला असता विल्यम - इतकं सुंदर लिहीलेलं आहे!
शेवटी मूळ प्रश्न रहातोच - काय गरज होती विल्यमसारख्या इंग्रजाला त्याच्या धर्माशी अजिबात संबंधित नसलेल्या कसल्यातरी पुस्तकाचे भाषांतर करून त्यावर विवेचन लिहायची? कोण वाचणार होते ते? कसलं बक्षिस मिळणार होतं त्याला? काय फायदा होता त्यात त्याचा? हे राहूदे - आपल्यापैकी किती जणांना 'पंढरी माहात्म्य' एेकून माहीत होतं? किती जणांनी ते प्रत्यक्ष बघितलंय वा वाचलंय ते तर सोडूनच द्या!
आपण पाश्चात्यांचं अनुकरण केलं पण अगदी चुकीच्या गोष्टीत ह्याचा हा अजून एक पुरावा. इंग्रजांनी आम्हांला गुलामगिरीत ठेवलं म्हणून आमचा विकास खुंटला म्हणणाऱ्यांनी स्वातंत्र्यानंतर आपण 'आपल्या' गोष्टी जपण्यासाठी कितीसे कष्ट घेतले हे पाहिलेत का? जे घेत होते त्यांना आपल्या लोकांनी किती मदत केली? आणि आज काय करत आहोत आपण? चक्क वारीवरून राजकारण?
एकादशीचा आता संबंध दुर्दैवाने फक्त 'दुप्पट खाशी'चीच उरलेला आहे. हे जर असेच चालू राहिले तर एके काळी सर्रास घराघरांत आढळणारी 'शुभं करोति', 'संपूर्ण चातुर्मास' वगैरे नेहेमीची पुस्तके काही वर्षांनी पहायलाही फक्त ब्रिटीश लायब्ररीतच मिळतील ह्याची खात्री बाळगा - आणि पुन्हा ‘इंग्रजांनी आम्हांला लुटले’ म्हणून गळे काढायला आपण मोकळे!
जय हरि विठ्ठल!
- संकेत कुलकर्णी (लंडन)