Menu
Log in


Log in


Marathi Divas

26 Jul 2018 1:21 PM | Tanvi Mahajan (Administrator)

कुसुमाग्रजांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून उत्साहात साजरा होत आहे. 

ज्ञानपीठ विजेते ज्येष्ठ मराठी साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्म 27 फेब्रुवारी १९१२ मध्ये झाला होता. कवितेमध्ये रमतांना कुसुमाग्रजांनी कथा, कादंबरी, नाटक, ललित वाड्यमयातही मुक्त विहार केला. वयाच्या १७व्या वर्षापासून 'बालबोधमेवा' या मासिकातून कुसुमाग्रजांनी कविता आणि ललित साहित्य लिहायला सुरुवात केली. १९४२मध्ये प्रसिद्ध झालेला 'विशाखा' हा त्यांचा काव्य संग्रह साहित्यातला ठेवा आहे.
'नटसम्राट' या महान नाट्यकृतीसाठी कुसुमाग्रजांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. तर १९८८मध्ये ज्ञानपीठ पुरस्कारानं त्यांच्या साहित्यसेवेचा गौरव करण्यात आला. साहित्यातला सर्वोच्च पुरस्कार मिळवणारे कुसुमाग्रज दुसरे मराठी साहित्यिक होते.

कुसुमाग्रजांच्या क्रांतीचा जयजयकार, वेडात मराठे वीर दौडले सात, आगगाडी आणि जमीन, पृथ्वीचं प्रेमगीत या कविता आजही तितक्याच लोकप्रिय आहेत. 

सामाजिक अन्याय, विषमता यावर कुसुमाग्रजांनी आपल्या लेखणीतून प्रहार केला. केवळ लिखाण करुन ते थांबले नाही तर चळवळींमध्येसुद्धा त्यांचा सहभाग होता. त्यामुळे एका अर्थाने कुसुमाग्रज सामाजिक चळवळीचे ते प्रणेते होते.