Menu
Log in


Log in


इतिहासात २८ जानेवारी

28 Jan 2022 5:40 AM | Amol Sawarkar (Administrator)

१६४६: मराठी राज्याची राजमुद्रा वापरुन लिहीलेले शिवाजीराजांचे पहिले पत्र

राजमुद्रा ग्राफिक्स - Home | Facebookपत्राची तारीख तेव्हा रूढ असलेल्या कालगणनेनुसार ‘२० जिल्हेज, शुहूर सन १०४६’ अशी आहे. ती २८ जानेवारी १६४६ या तारखेशी जुळते. म्हणजे हे पत्र लिहिले तेव्हा शिवाजी महाराजांच्या वयाची १६ वर्षे पूर्ण व्हायला २१ दिवसांचा अवधी होता. शिवाजीमहाराजांची म्हणून लिहिलेली या तारखेपूर्वीची चार पत्रे आजवर उजेडात आली आहेत. तरीही त्यांचा शिक्कामोर्तब असलेले सर्वात जुने पत्र आहे यात काही संशय नाही.खेडेबारे तरफेतील- म्हणजे सध्याच्या परिभाषेत तालुक्यातील, रांझे या गावच्या पाटलाने ‘बदअमल’ केला म्हणून त्याचे हात-पाय तोडून महाराजांनी त्याला पाटीलकीवरून काढून टाकले आणि ती पाटीलकी त्याच्याच गोतातील सोनजी बजाजी याला दिली.

सोनजीला ‘पाटील’ म्हणून नेमल्याचे २८ जानेवारी १६४६ या तारखेचे जे पत्र महाराजांनी खेडेबारे तरफेच्या सरकारी अधिकाऱ्यांना व देशमुखांना पाठविले, ते हे पत्र. त्यात ही सर्व हकीकत नमूद केली आहे. अर्थात त्याला शिक्षा करण्यापूर्वी त्याला पकडून आणवून त्याच्या गुन्ह्य़ाची महाराजांनी चौकशी केली होती आणि त्याने गुन्हा केल्याचे सिद्ध झाले होते, हेही त्या पत्रात सांगितले आहे.

हे पत्र तीन कारणांकरिता महत्त्वाचे आहे : त्याची तारीख, त्यावरील शिक्कामोर्तब आणि त्यात आलेली हकीकत. महाराज त्यांना १७ वे वर्ष लागण्यापूर्वीच कारभार पाहू लागले होते, असे या पत्राच्या तारखेवरून दिसते. त्यांचे पुढील काळातील चरित्र विचारात घेतले तर पत्रातील निर्णय त्यांच्या वतीने दुसऱ्या कोणी घेतलेला नसून त्यांनी स्वत:च घेतलेला होता असे मानण्यास हरकत नाही. 

१९९७: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संख्याशास्त्रज्ञ व आहारतज्ञ डॉ. पांडुरंग वासुदेव तथा पां. वा. सुखात्मे यांचे निधन. 

P.V. Sukhatme IIT Bombayपोषक आहारतज्ज्ञ म्हणून नाव झालेले संख्याशास्त्रज्ञ डॉ. पांडुरंग वासुदेव सुखात्मे यांच्या कारकिदीर्चा आरंभ झाला तो कृषी संशोधन संख्याशास्त्रज्ञ म्हणून. लंडन युनिव्हसिर्टी कॉलेजमधून पीएच्.डी. (१९३६) व डी.एस्सी. (१९३९) ह्या अत्युच्च पदव्या संपादन केल्यावर आपल्या ह्या ज्ञानाचा उपयोग भारतातल्या गरीब जनतेस व्हावा म्हणून सुखात्मे यांनी सुखाच्या प्राध्यापकीऐवजी कर्तबगारीस आव्हान देणारं शेतकी संशोधनक्षेत्र नोकरीसाठी निवडलं. लंडनला शिकताना, विषयाच्या सैद्धांतिक बाजूऐवजी त्यांनी नमुना निवड पाहणी, सवेर्क्षणाचं पद्धतीशास्त्र अशा कौशल्यांचा उपयोग करून पशुसंवर्धन, दुग्धोत्पादन, एकरी पिकांचा अंदाज, जागतिक भूक इ. सामान्य माणसाच्या जीवनाशी भिडणाऱ्या मूलभूत प्रश्नांकडं आपल्या संशोधनाची दिशा वळवली.

भारतात परतल्यावर 'अ. भा. स्वास्थ्य व सार्वजनिक आरोग्य' या कोलकात्याच्या संस्थेत केलेल्या पहिल्याच नोकरीत, डॉक्टर झालेल्या विद्यार्थ्यांना शिकवताना आलेल्या अनुभवातून सुखात्म्यांना सैद्धांतिक तत्त्वांची व्यवहारोपयोगी उदाहरणांशी सांगड घालण्याची सवय लागली.

डॉ. सुखात्मे यांनी व्यावहारिक उपयोगासाठी नमुना निवड पाहणी व पद्धतीशास्त्रविषयक जे अनेक नवीन उपक्रम भारतात विकसित केले, त्यांची कीर्ती युनोच्या ‘एफएओ’पर्यंत जाऊन धडकली. त्यामुळे त्या संघटनेनं सुखात्मे यांना आग्नेय आशियातल्या सरकारी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी पाचारण केलं. १९४८पासून ते ‘एफएओ’चं संख्याशास्त्र प्रमुखपद स्वीकारून ते १९५१ साली रोम इथं रुजू झाले.सुखात्मे यांच्या कार्याचा व सेवेचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक पारितोषिकांनी व सन्मानांनी गौरव करण्यात आला आहे. ‘ द वर्ल्ड्‌स हंगर अँड फ्यूचर नीड्स इन फुड सप्लाय ‘ या निबंधाबद्दल त्यांना १९६३ मध्ये रॉयल स्टॅटिस्टिकल सोसायटी (लंडन) या संस्थेचे गाय सिल्व्हर पदक मिळाले. हे पारितोषिक मिळविणारे सुखात्मे पहिले भारतीय होत. विज्ञान विकास आणि मानवतेचे कल्याण यांतील असामान्य योगदानाबद्दल त्यांना भारत सरकारने पद्मभूषण हा किताब देऊन गौरविले (१९७३). 

सेवानिवृत्तीनंतर त्यांनी पुण्यात स्थायिक झाल्यावर आपल्या ज्ञानाचा गोरगरीबांना उपयोग करवून देण्याचं ठरवलं. पुढे तिथेच त्यांचे निधन झाले

१६१६: संत दासोपंत समाधिस्थ झाले.

श्री दासोपंत (शके १४७३ – १५३७) | श्री दत्त महाराजदासो दिगंबरपंत देशपांडे ऊर्फ दासोपंत हे मराठी भाषेच्या इतिहासातील सर्वाधिक लेखन करणारे संत-कवी होते. ते संत एकनाथांचे समकालीन होते. दासोपंत दत्तात्रेयांचे परम भक्त होते. यांच्या एकूण रचनांची संख्या सुमारे ५ लाख ओव्यांपर्यंत समजली जाते. त्यांनी काही लिखाण दिगंबरानुचर या टोपणनावाखाली केले आहे.त्यांना संत सर्वज्ञ दासोपंत असेही म्हणतात. त्यांनी केवळ अफाट साहित्य निर्माण केले, असे नाही तर त्यातील वैविध्य, वैचित्र्य, विलक्षणता यामुळे त्यांचे साहित्य संत काव्यांत आपली विशिष्टता सिद्ध करते. त्यांनी अंबाजोगाईत मंदिर परंपरेत धर्मसंप्रदायी उपासनेला कलात्मक अधिष्ठान दिले. 

दासोपंतांच्या सव्वालक्ष पदांच्या अर्णवात विविध भाषांची पदे आढळतात. त्यात संस्कृत, प्राकृत, मराठी (नागर, ग्रामीण, वैदर्भीय बोली) हिंदूी (हिंदूुस्थानी विविध छटा), ब्रज, फार्सी-उर्दूमिश्रीत हिंदूी, कन्नड, तेलुगु इ. भाषावैविध्य आहे. तसेच हिंदी-मराठी या दोन भाषामिश्रित मणिप्रवाळ रचनाही आढळते. दासोपंतांचे तीर्थाटन, विविध प्रांतांतून भ्रमण आणि तेलंगणा व कर्नाटक यांच्या सीमेवर असलेली त्यांची जन्मभूमी, महाराष्ट्रातील दीर्घकालीन वास्तव्य; यामुळे त्यांची पदरचना बहुभाषिक बनली.

श्रीदत्तात्रेयाच्या आदेशावरून दासोपंत राक्षसभुवनी गेले तिथे गंगातीरी वाळूमध्ये दत्तात्रेयांच्या पादुकांचा प्रसाद प्राप्त झाला. आजही धाकटे देवघरी या पादुका पाहावयास मिळतात.

दासोपंतांनी शके १५३७मध्ये, माघ वद्य षष्ठी या दिवशी समाधी घेतली. त्यावेळी ते ६५ वर्षांचे होते. अंबेजोगाई(जिल्हा बीड) येथे नृसिंहतीर्थावर दासोपंतांची प्रशस्त समाधी आहे.


संदर्भ

https://www.loksatta.com/lokrang/shivaji-maharajs-first-social-letter-29990/#:~:text=%E0%A4%A4%E0%A5%80%20%E0%A5%A8%E0%A5%AE%20%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80%20%E0%A5%A7%E0%A5%AC%E0%A5%AA%E0%A5%AC%20%E0%A4%AF%E0%A4%BE,%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%80%20%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8%20%E0%A4%A4%E0%A5%80%20%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%9F%20%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%A4.

https://maharashtratimes.com/editorial/manasa/-/articleshow/9677939.cms

https://www.bytesofindia.com/newsdetails?NewsId=4920191856530621386

https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8B_%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0_%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87