१९११: शास्त्रीय गायक पं. गजाननबुवा जोशी यांचा जन्म.
गजाननराव यांचा जन्म गिरगाव, मुंबई येथे झाला. त्यांचे वडील पं. अनंत मनोहर जोशी व आजोबा मनोहरबुवा हे देखील उत्तम गवई होते. विनायकबुवा घांग्रेकर यांच्याकडून ते तबला शिकले. यथावकाश त्यांनी रामकृष्णबुवा वझे (ग्वाल्हेर घराणा) आणि प्रौढवयात उस्ताद भूर्जीखाँ (जयपूर घराणा), उस्ताद विलायत हुसेनखाँ (आग्रा घराणा) यांच्याकडेही गाण्याची तालीम घेतली.वयाच्या साधारण सोळाव्या वर्षापासून व्हायोलीनवादनाचे जाहीर कार्यक्रम करू लागले. त्यांना पुण्यामध्ये भारत गायन समाजात संगीतशिक्षकाची नोकरी मिळाली. १९२८ पासून त्यांनी मुंबई आकाशवाणीवर गायन व व्हायोलिन वादनाचे कार्यक्रम करण्यास सुरुवात केली. त्यावेळी एच.एम.व्ही. कंपनीने त्यांच्या व्हायोलीनवादनाची पहिली ध्वनिमुद्रिका काढली. पुढे दिल्ली आकाशवाणीवर त्यांनी सल्लागार म्हणून काम केले. या नोकरीमुळे त्यांची मुंबई, इंदूर, लखनऊ अशी अनेक ठिकाणी भ्रमंती झाली (१९५६–१९६८). गजाननबुवा मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागातही प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांनी अनेक संगीतपरिषदांमधून भाग घेतला होता.गजाननरावांना १९७२ मध्ये संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार, आयटीसी सन्मान (१९८२) व मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार (१९८५) लाभला.
१९२९: हिंदी, मराठी चित्रपटांतील व रंगभूमीवरील अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक रमेश देव यांचा जन्म.
रमेश देव यांचा जन्म अमरावतीत झाला पण ते प्रत्यक्षात जोधपूर राजस्थानचे आहेत. त्यांचे मोठे आजोबा अभियंता होते आणि वडील कोल्हापुरात न्यायाधीश होते.रमेश १९५१ मध्ये बालकलाकार म्हणून “पटलाची पोर” चित्रपटात दिसले. त्याने ‘सीमा देव’ या नामांकित अभिनेत्रीशी लग्न केले. या दोघांना अजिंक्य आणि अभिनय हे दोन मुलगे आहेत.कोल्हापूर हे कलाकारांचे शहर. या शहराने अनेक कलावंत चित्रपटसृष्टीला दिले. रमेश देव हे त्यातीलच एक. त्यांच्याशिवाय मराठी चित्रपटसृष्टीचा इतिहासच पूर्ण होऊ शकत नाही, एवढे मोठे योगदान त्यांचे आहे. एक काळ तर असा होता, की रमेश आणि त्यांची पत्नी सीमा देव चित्रपटात असतील तर तो हीट होणार अशी खात्री असायची.रमेश देव यांनी नायकाच्या भूमिका केल्याच, पण ते उठून दिसले ते खलनायकी भूमिकेत. 'भिंगरी' चित्रपटात त्यांनी साकारलेला खलनायक अविस्मरणीयच. मराठीत यापूर्वी खलनायक रूबाबदार असू शकतो ही संकल्पनाच नव्हती. रमेश देव यांनी खलनायकी भूमिकेला ग्लॅमर मिळवून दिले.
तरीही त्यांनी स्वतला विशिष्ट परिघात अडकवून न घेता चौफेर मुशाफिरी केली. त्यांनी नायक, सहनायक, चरित्र अभिनेता ते खलनायक अशा सर्वच भूमिका केल्या. निर्माता, दिग्दर्शक अशा विविध प्रांतातही ठसा उमटवला. त्याचा 'सर्जा' हा ऐताहासिक पार्श्वभूमी असलेला चित्रपट चांगलाच गाजला.
अनेक हिंदी चित्रपटातही त्यांनी उत्तमोत्तम भूमिका केल्या. ऋषीकेश मुखर्जींच्या 'आनंद' चित्रपटात राजेश खन्नाचा डॉक्टर मित्र खरोखरीच मनापासून रंगवला. त्यांच्या या भूमिकेला दादही मिळाली.
१९४९: नाटककार, दिग्दर्शक आणि निर्माते, थिएटर अॅकॅडमी चे एक संस्थापक, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा चे संचालक, साहित्य अकादमी पारितोषिक विजेते डॉ. सतीश आळेकर यांचा जन्म
आळेकरांचा वाडा पुण्यातील शनिवार पेठेत काकासाहेब गाडगीळांच्या वाड्यापासून हाकेच्या अंतरावर होता. आळेकरांचे शिक्षण महाराष्ट्रातील पुण्यात झाले. इ.स. १९७२ साली ते पुणे विद्यापीठातून बायोकेमिस्ट्री हा विषय घेऊन एम.एस्सी. झाले. तत्पूर्वी फर्ग्युसन कॉलेजमधून ते बी.एस्सी. झाले होते.
शाळकरी वयात 'शांतता! कोर्ट चालू आहे’चा प्रयोग आळेकरांनी पाहिला आणि ते भारावून गेले. एका नाट्यप्रयोगाचा इतका खोल परिणाम होऊ शकतो, हे त्यांना नवीनच होते. आळेकरांनी नाटकांबद्दल गांभीर्याने विचार करायला सुरुवात केली, आणि ते पुढील जीवनात खरोखरच नाटककार झाले.. फर्ग्युसनच्या गणेशोत्सवातील बबन प्रभू यांच्या 'दिनूच्या सासूबाई राधाबाई’ या गंमत-नाटकात दिनू ही भूमिका आळेकरांनी केली असली तरी, सतीश आळेकरांची दिग्दर्शक व अभिनेता म्हणून खरी कारकीर्द तेंडुलकरांच्या नाटकांपासून सुरू झाली. ’ओळख', 'काळोख' या तेंडुलकरांच्या एकांकिकांत त्यांनी अभिनय केला होता. पुढे भालबा केळकरांनी स्थापन केलेल्या प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोशिएशनमध्ये ('पीडीए'मध्ये)आळेकर दाखल झाले आणि घाशीराम कोतवालचे सहदिग्दर्शन त्यांनी केले.
'मेमरी' ही पहिली एकांकिका आळेकरांनी 'पीडीए'च्या शशिकांत कुलकर्णी यांना वाचून दाखविली. त्यांनी ती 'सत्यकथे'ला पाठली.सतीश आळेकर यांनी 'दिनूच्या सासूबाई राधाबाई',बेगम बर्वे,’ओळख', 'काळोख' या नाटकात आणि 'चिंटू',चिंटू - २,'व्हेंटिलेटर',भाई,भाई - २, मी शिवाजी पार्क, अय्या,चि व चि सौ कां ,राजवाडे अँड सन्स,स्माईल प्लिज,हाय वे,देऊळ बंद,जाऊंद्या ना बाळासाहेब इत्यादी चित्रपटांत भूमिका केल्या आहेत.तसेच जैत रे जैत, कथा दोन गणपतरावांची ह्या चित्रपटांचे लेखनही केले
रंगभूमीप्रमाणेच 'जैत रे जैत' चित्रपटाची पटकथा, 'देखो मगर प्यार से' ही दूरदर्शन मालिका, 'कथा दोन गणपतरावांची' या चित्रपटाचे संवादही आळेकरांनी लिहिले आहेत.रविवारच्या ‘लोकसत्ते’तील ‘लोकरंग’ या पुरवणीमध्ये सतीश आळेकर ‘गगनिका’ नावाचे सदर लिहीत असत. हे सदर पुढे त्याच नावाने पुस्तकरूपात प्रकाशित झाले. स्वातंत्र्योत्तर काळातील घटनांचे सांस्कृतिक पटलावर उमटलेले प्रतिबिंब असे स्वरूप असलेले हे पुस्तक म्हणजे ‘नाटकाचे नसलेले, पण नाटकाविषयी असलेले’ असे आहे. १९७५ची आणीबाणी आणि ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशिदीचे झालेले पतन या दोन घटना केंद्रस्थानी ठेवून २० वर्षांच्या कालखंडातील नाटकांचा ऊहापोह आळेकरांनी या लेखनाच्या माध्यमातून केला आहे.
संदर्भ
https://marathivishwakosh.org/31018/
https://marathi.webdunia.com/article/marathi-film-stars/%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5-107051900006_1.htm
https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B6_%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4_%E0%A4%86%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0