१८३२: पहिले क्रांतिकारक व स्वातंत्र्यसैनिक उमाजी नाईक यांना ब्रिटिश सरकारने फाशी दिली.
उमाजी नाईक यांचे नेतृत्व महत्त्वाचे होते. त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील भिवडी (ता. पुरंदर) येथे झाला. वडील दादजी खोमणे हे पुरंदर किल्ल्याचे रखवालदार म्हणून काम करत होते. छ. शिवाजी महाराजांच्या काळापासून अनेक किल्ल्यांची राखणदारी या समाजाकडे सोपविण्यात आली होती. उमाजी लहानपणापासून वडिलांसोबत पुरंदरच्या रखवालीचे काम करत. आपल्या वडिलांकडून त्यांनी गोफण चालविणे, तीरकमठा मारणे, कुऱ्हाड चालविणे, भाला फेकणे, तलवार व दांडपट्टा चालविणे इ. कौशल्ये आत्मसात केली होती. उमाजी ११ वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले (१८०२) आणि वंशपरंपरेने वतनदारी त्यांच्याकडे आली.
उमाजी खंडोबाचा भक्त होते. त्यांच्या पत्रावर ‘खंडोबा प्रसन्न’ असे शीर्षक दिसते. त्यांचा भाऊ आमृता याने सत्तू बेरडाच्या नेतृत्वाखाली इंग्रजांचा भांबुर्ड्याचा लष्करी खजिना लुटला (१८२४-२५). या लुटीमध्ये उमाजींची भूमिका महत्त्वाची होती. १८२५ मध्ये सत्तू मृत्यू पावल्यानंतर त्याच्या टोळीचे उमाजी प्रमुख झाले. उमाजींविरुद्ध इंग्रज सरकारकडे तक्रारी वाढल्याने २८ ऑक्टोबर १८२६ रोजी इंग्रजांनी त्यांच्याविरुध्द पहिला जाहीरनामा काढला. यामध्ये उमाजी व त्यांचा साथीदार पांडूजी यांना पकडून देणाऱ्यांना १०० रु. चे बक्षीस जाहीर केले. इंग्रज सरकारने उमाजींना पकडण्यासाठी स्वतंत्र घोडदळाची नियुक्ती केली व १५२ ठिकाणी चौक्या बसविल्या, परंतु उमाजी इंग्रजांच्या हाती सापडले नाहीत.
उमाजी आपल्या हातामध्ये येत नाही म्हटल्यावर इंग्रजांनी त्यांची पत्नी, दोन मुले व एका मुलीस कैद केले. तेव्हा उमाजी इंग्रजांना शरण गेले. इंग्रजांनी त्यांचे सगळे गुन्हे माफ केले व आपल्या पदरी नोकरीस ठेवले. १८२८–२९ या काळात उमाजींकडे पुणे व सातारा या भागात शांतता ठेवण्याची जबाबदारी होती. या काळात त्यांनी अनेक मार्गांनी पैसा जमा केला. त्यामुळे इंग्रजांनी ऑगस्ट १८२९ मध्ये त्यांच्यावर लुटमारी, खंडण्या गोळा करणे, मेजवाण्या घेणे इत्यादी आरोप ठेवले; परंतु नोकरीतून काढून टाकले नाही. या काळात उमाजींनी इंग्रजांविरोधात सैन्य जमवण्यास सुरुवात केली होती. भाईचंद भीमजी प्रकरणात त्यांनी पैसे उकळल्याचे प्रकरण समोर आल्यावर इंग्रजांनी अचानक उमाजींना कैद केले; मात्र त्यातूनही निसटून ते कऱ्हे पठारावर गेले. या ठिकाणाहून इंग्रजांच्या विरोधात त्यांनी कारवाया सुरू केल्या.
पुढच्या पाच वर्षात हे बक्षीस आधी १२०० रु आणि नंतर ५००० र. एवढे वाढवले गेले. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अनेक इंग्रज अधिकारी नेमले गेले. ८ ऑगस्ट १८३१ रोजी इंग्रजांनी आणखी एक जाहीरनामा काढून उमाजींना पकडून देणाऱ्यास १०,००० रु. बक्षीस व ४०० बिघे जमीन देण्याचे जाहीर केले. या आमिषाला उमाजीचे दोन साथीदार काळू व नाना हे बळी पडले. त्यांनी उमाजींना १५ डिसेंबर १८३१ रोजी स्वत: पकडून इंग्रजांच्या स्वाधीन केले. त्यानंतर इंग्रजांनी उमाजींना पुणे येथे ३ फेब्रुवारी १८३४ रोजी फाशी देण्यात आली. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस महाराष्ट्रातील इंग्रज सत्तेच्या विरोधात तळागाळातील लोकांकडून घडून आलेला हा पहिला क्रांतिकारी प्रयत्न होता.
संदर्भ
https://marathivishwakosh.org/29143/