१९२२: शास्त्रीय गायक स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांचा जन्म.
भीमसेन गुरुराज जोशी. त्यांचा जन्म गुरुराज व रमाबाई या दांपत्यापोटी धारवाड जिल्ह्यातील रोण या त्यांच्या मावशीच्या गावी झाला. त्यांचे मूळ गाव गदगजवळचे होंबळ असून आजोबा भीमाचार्य हे गदगमध्ये स्थायिक झाले होते. ते कीर्तनकार-गायक होते. भीमसेन यांची आईही सुमधुर भजने म्हणत असे, तर वडील गुरुराज हे शिक्षक असून वेदान्तपारंगत होते. त्यांचे घराणे वंशपरंपरागत ज्योतिषी होते.
ची गाण्याची आत्यंतिक आवड पाहून वडलांनी उ. इनायतखाँ यांचे गदगमधील शिष्य अगसरू चन्नाप्पा कुर्तकोटी ह्यांच्याकडे भीमसेन यांना गाण्याची शिकवणी सुरू केली. त्यांच्याकडून वर्षभरात २०-२१ रागांशी त्यांचा प्राथमिक परिचय झाला; पण सखोल ज्ञानाची आस लागून राहिली. गुरूच्या शोधात ते घराबाहेर पडले आणि उपाशी-अर्धपोटी, रेल्वेने विनातिकीट प्रवास करत ग्वाल्हेरला हाफीज अलीखाँ यांच्याकडे (सरोदवादक अमजद अलीखाँ यांचे वडील) पोहोचले.
पुढे कोलकात्याला (पूर्वीचे कलकत्ता) पहाडी संन्याल ह्यांच्याकडे गांधारी हा अनवट राग, धृपदिये मंगतराम ह्यांच्याकडे धृपद संगीताची तालीम घेतली. सवाई गंधर्वांकडे त्यांनी निरलसपणे गुरुसेवा करून व अतिशय कष्टाने गानविद्या संपादन केली. गंधर्वांनी पुढच्या शिक्षणाला अचानक नकार दिल्यामुळे भीमसेन रामपूर संस्थानात मुश्ताक हुसेनखाँ साहेबांकडे गेले. पुढे सवाई गंधर्वांनी भीमसेन यांना पुन्हा बोलावले. त्यांच्याकडे तोडी, मुलतानी व पूरिया ह्या फक्त तीन रागांचा सराव तीन वर्षे चालला. सवाई गंधर्वांच्या षष्ट्यब्दीपूर्तीच्या पुण्याच्या समारंभात ते प्रथमच चमकले (१९४६). कोलकात्याला झालेल्या एंटाली संगीत महोत्सवात त्यांनी सादर केलेल्या गायनास बंगाली रसिकांनी भरभरून दाद दिली (१९५३). भीमसेनांची कीर्ती देशात व विदेशांतही पसरत गेली.धन्य ते गायनीकळा ह्या नाटकाचे त्यांनी संगीत-दिग्दर्शन केले (१९६८). गुळाचा गणपती, बसंतबहार, भैरवी, पतिव्रता, स्वयंवर झाले सीतेचे ह्या चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले. संतवाणी हा अभंगांचा व रंगवाणी हा नाट्यगीतांचा खास आविष्कार, बालमुरलीकृष्णन् ह्या दाक्षिणात्य संगीततज्ज्ञाबरोबरची जुगलबंदी, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यासोबतचे ध्वनिमुद्रण, भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवात (१९९७) संसदेत सादर केलेले वंदे मातरम्, मिले सूर मेरा तुम्हारा ह्या राष्ट्रैक्याच्या बहुभाषिक गीतातील प्रमुख सहभाग ही त्यांची मैफलींशिवायची गानविविधता आहे.
पं. भीमसेन जोशी यांना शासनाकडून पद्मश्री (१९७२), पद्मभूषण (१९८५), पद्मविभूषण (१९९९) ह्या व २००८ मध्ये ‘भारतरत्न’ ह्या सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ह्यांव्यतिरिक्त संगीतरत्न (१९७१), संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार (१९७६) इत्यादी सन्मान त्यांना लाभले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, गुलबर्गा विद्यापीठ व टिळक महाराष्ट्र विद्यापीठ ह्यांनी त्यांना सन्मान्य डी. लिट पदवी प्रदान केली.सवाई गंधर्वांना देवाज्ञा झाल्यावर (१९५२) नानासाहेब देशपांडे (सवाई गंधर्वांचे जावई) व पं. भीमसेन यांनी पुण्यात ‘सवाई गंधर्व पुण्यतिथी संगीत महोत्सव’ सुरू केला (१९५३). त्यास उत्तरोत्तर श्रोत्यांचा वाढता प्रतिसाद मिळाला. पुढे ‘सवाई गंधर्व संगीत महोत्सव’ हा राष्ट्रीय स्तरावरचा कार्यक्रम झाला. या महोत्सवास नामांकित गायक-गायिका हजेरी लावतात. पं. भीमसेन यांच्या गायनाने या महोत्सवाचा शेवट होत असे.
१६७०: ज्याच्या मृत्युमुळे शिवाजी महाराजांनी गड आला पण सिंह गेला असे उदगार काढले, त्या तानाजी मालुसरे यांचा सिंहगडावर मृत्यू.
तानाजी मालुसरे हा मराठा साम्राज्याचा सेनापती होता. मराठा साम्राज्याचे नाव ऐकल्यावर फक्त शिवाजीं महाराजांचे नाव आठवते, पण तानाजी मालुसरे हेच त्यांच्या मदतीने शिवाजी महाराजांनी सिंहगड सारख्या मोगलांचा मजबूत किल्ला जिंकला. एकदा कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजानी तानाजी मालुसरेला दिली होती. जेव्हा तानाजीला ह्या जबाबदारी समजली तेव्हा ते स्वतःच्या मुलाच्या लग्ना़च्या तयारीत होते. महाराजांचा संदेश मिळत्याक्षणी तानाजींना जाणवले की निश्चितच काही महत्त्वाचं काम असावं. तानाजी तयारी अर्धवट सोडून स्वराज्यासाठी आपल्या कामाला प्राधान्या देत महाराजांसमक्ष प्रस्तुत झाले.
महाराजांनी सांगितले की आता कोंढणा किल्ला जिंकणे मानाची गोष्ट झाली असून जगहसाई होता कामा नये. तेव्हा तानाजींनी चौक्या-पहारे व अतिशय कडेकोट बंदोबस्त असलेला आणि उदयभानसारखा पराक्रमी किल्लेदार असलेला कोंढाणा किल्ला ताब्यात घेण्याचा विडा उचलला. ते कोंढाणा जिंकण्यासाठी आपल्या तुकडी बरोबर निघाले. आधी लगीन कोंढाण्याचे मग लगीन रायबाचे. "हे त्यांचे शब्द इतिहासात प्रसिद्ध पावले आहेत. .रात्रीच्या वेळी केवळ पाचशे सैनिकांबरोबर द्रोणगिरीचा कडा चढून त्यांनी सिंहगडावर हल्ला केला. तानजींनी गडाच्या मागच्या बाजूने आपल्या घोरपडीला वर पाठवले. तिच्या शेपटीला दोर बांधला होता. मावळे त्या दोरीला पकडून वर चढून गेले. अचानक हल्ला करून त्यानी तेथील सैन्याला कात्रीत पकडले.
तिथे झालेल्या अतीतटीच्या लढाईत तानाजींना त्यांच्या प्राणाची आहुती द्यावी लागली. हे दुसर्या दिवशी श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे सिंहगडावर पोहचले तेव्हा त्यांना समजले. महाराज म्हणाले "गड आला पण सिह गेला".
१८९३: मराठी कोशकार आणि लेखक चिंतामण गणेश कर्वे यांचा जन्म.
चिंतोपंत कर्वे यांचा जन्म बडोद्यास झाला. तथापि त्यांचे शिक्षण पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूल व फर्गसन महाविद्यालयात झाले. १९१७ मध्ये ते गणित विषय घेऊन पदवीधर झाले. डॉ.श्री.व्यं.केतकर यांनी मराठी ज्ञानकोशाची योजना सिद्ध करण्यासाठी उभारलेल्या कंपनीत कर्वे दाखल झाले, तसेच य.रा.दाते हेही सहभागी झाले. केतकरांच्या हाताखाली कर्वे यांना ज्ञानाचे संकलन करण्याची कला अवगत झाली, भरपूर वाचन झाले व अभ्यास घडला. कोशविद्येचे मर्म हाती आले. नियमितपणे परिश्रम करण्याची सवय लागली. या जोडीने केतकरी खाक्यात काम करण्यास लागणारे धैर्य व चिकाटी दाखवली म्हणूनच नेटाने काम करून ते ‘कोशकार’ झाले. कर्वे यांचा प्रपंच कसाबसा चालला, परंतु त्यांनी कधी तोंड वेंगाडले नाही किंवा आपल्या कामात उणेपणा येऊ दिला नाही.
कोशकार्याखेरीज कर्वे यांनी ‘मानवी संस्कृतीचा इतिहास’ (१९३१), ‘प्राच्य आणि पाश्चात्त्य नीतिध्येये’ (१९३७), ‘आनंदीबाई पेशवे’ (१९४०), ‘मराठी साहित्यातील उपेक्षित मानकरी’ (१९५७), ‘कोशकार केतकर’ (य.रा.दाते ह्यांच्या सहकार्याने, १९५९) यांसारखी पुस्तके लिहिली. शिवाय निरनिराळ्या नियतकालिकांतून भाषा, वाङ्मय, इतिहास, संस्कृती आदी विषयांवर चारशेहून अधिक लेख लिहिले. कर्वे यांच्या लेखनात माहितीचा अचूकपणा, मांडणीचा नेटकेपणा जाणवतो.
महाराष्ट्राचे सांस्कृतिक जीवन उंचावणार्या अनेक कार्यांत कर्वे आपुलकीने लक्ष घालीत. महाराष्ट्र साहित्य परिषदेची धुरा त्यांनी अनेक वर्षे संभाळली. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चिटणीस पदावरही ते होते. भारत इतिहास संशोधक मंडळाचे कर्वे हे दहा वर्षे चिटणीस होते. पुणे विद्यापीठाच्या सदस्य मंडळावर ते होते. ग्रंथ प्रकाशन आणि प्रकाशन अनुदान समितीत ते कार्यरत होते. सरकारच्या पेशवे दप्तर समितीचे सदस्यही ते होते. काम पत्करले की त्या-त्या संस्थांच्या सभांना नियमितपणे हजर राहून ते त्यात आपला वाटा उचलत.
संदर्भ
https://marathi.webdunia.com/article/marathi-general-knowledge/about-tanaji-malusare-119111900031_1.html
https://marathivishwakosh.org/9572/
https://maharashtranayak.in/karavae-caintaamana-ganaesa