Menu
Log in


Log in


इतिहासात ९ फेब्रुवारी

8 Feb 2022 9:47 PM | Amol Sawarkar (Administrator)

१९३३: साने गुरुजी यांनी नाशिकच्या कारागृहात असताना श्यामची आई या पुस्तकाच्या लेखनाला सुरुवात केली.

श्यामची आईमुलांवर संस्कार करणं हे आपल्या पालकांना महत्त्वाचं वाटतं. ‘संस्कार’ हा आपल्याकडे टिकून राहिलेला शब्द आहे. त्याला इंग्लिशमध्ये समांतर शब्द नाही. एके काळी upbringing हा शब्द होता. आता तो कोणी वापरत नाही. पाश्चात्त्य संस्कृतीने इतर मूल्ये स्वीकारली आहेत. आपण जी होती, ती जपून ठेवली आहेत. अशा ह्या आपल्या संस्कृतीविषयी ज्या ग्रंथात कलात्मकतेने भाष्य केलेलं आहे, तो ग्रंथ लोकप्रिय होणारच. आणि काही काळाने तो पूजनीयदेखील होऊ शकतो. ‘श्यामची आई’चं तसं झालं आहे. म्हणून हे पुस्तक आपल्या घरी असावं, असं आपल्याला आवर्जून वाटतं. आपण ते वाचलंच पाहिजे, अशी भावना आपल्यात निर्माण होते. पुस्तक आपल्याकडे असणं, ते आपण वाचणं हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे, असं आपण समजतो. ‘श्यामची आई’अजरामर झालं आहे ते ह्या कारणांमुळे.

दि. 9 फेब्रुवारी 1933 रोजी नाशिकच्या कारागृहात साने गुरुजींनी ‘श्यामची आई’ लिहायला घेतलं आणि 13 फेब्रुवारीला म्हणजे अवघ्या पाच दिवसात पूर्णदेखील केलं. फेब्रुवारी 1935 मध्ये ‘श्यामची आई’ ची पहिली आवृत्ती आली आणि 86 वर्षं झाली तरी विविध प्रकाशनांकडून आवृत्त्या येतच आहेत. आजपर्यंत ‘श्यामची आई’च्या लक्षावधी प्रती वाचकांपर्यंत पोचल्या. 1953 मध्ये आचार्य अत्रेंनी या पुस्तकावर आधारित मराठी सिनेमा आणला. राष्ट्रपतींचं पहिलं सुवर्णपदक या सिनेमाला मिळालं. एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे जाताना ‘श्यामची आई’ची नाट्यरूपांतरं झाली, अभिवाचनं झाली. विविध भाषांत अनुवाद झाले. त्यामध्ये हिंदी, इंग्रजी, गुजराती, आसामी, अरेबिक सिंधी, उर्दू, संस्कृत, कानडी, मल्याळी इत्यादीच नव्हे तर जापनीज भाषेचादेखील समावेश आहे

१८७४: स्वातंत्र्यशाहीर गोविंद त्र्यंबक दरेकर उर्फ कवी गोविंद यांचा जन्म. 

राष्ट्रस्वातंत्र्य द्या, हिंदभूला नवे!स्वातंत्र्यशाहीर कवी गोविंद |

धर्म-स्वातंत्र्य तें हिंदभूला हवे!

ज्ञानस्वातंत्र्य ती प्रार्थुनी मागते!

हिंदभू वांछिते सकल स्वातंत्र्य तें!

अशा काव्यांतून स्वातंत्र्याची ललकारी देणारे, राष्ट्रीय भावनेचे बीजारोपण करणारे आद्य कवी म्हणून कवी गोविंद यांचा उल्लेख केला जातो. स्वातंत्र्यलढ्यात मोलाची भूमिका वठविणाऱ्या सावरकरांच्या अभिनव भारत ऊर्फ मित्रमेळा संघटनेच्या कार्यात कवी व एक मुत्सद्दी म्हणून त्यांनी भूमिका निभावली होती. काव्य, कवित्व व स्वातंत्र्यत्व ही त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये होती.

बालपणीच कमरेपासून खालचा भाग लुळा पडला असल्याने कवी गोविंद यांनी अंथरुणावर पडूनच अनेक काव्य, पद्ये लिहिली. त्यांचे घर म्हणजे अभिनव भारतचे मुख्य ठिकाणच होते. त्यांच्या घरी संघटनेच्या नियमित सभा होत. पुस्तकालय, ऐतिहासिक किंवा इतर सामान ठेवण्याची ती जागाच होती. स्वातंत्र्यवीर सावरकर व लोकमान्य टिळकांसह अनेक स्वातंत्र्यसेनानींच्या सहवासाने त्यांच्या स्फूर्तीदायक कविता बहरत गेल्या. छत्रपती शिवाजी महारांजावरही त्यांनी अनेक काव्य, पोवाडे गायले होते.

१९१०च्या दशकात गोविंदांचे काव्य सरकार जमा झाल्याच्या नोंदी आढळतात. पण प्रत्यक्षात त्याचे पुढे काय झाले, याबाबत विशेष माहिती मिळत नाही. गोविंद यांच्या मृत्यूनंतर (१९२६) त्यांच्या काही मित्रांनी त्यांची उरलेली कवने प्रसिद्ध केली होती.

१९७९: चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते राजा परांजपे यांचे निधन. 

Remembering Raja Paranjpe, the legendary actor, director, producer, and writer in Marathi cinema, on his 109th birth anniversary today. | by Bollywoodirect | Mediumशाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात बसवलेल्या माधवराव जोशी यांच्या ‘विश्ववैचित्र्य’ नाटकात एका कलावंताने एक विनोदी भूमिका केली आणि प्रेक्षकांची वाहवा मिळवली. तारुण्यात आले, तो मूकपटांचा काळ होता. अशा मूकपटांना पार्श्वसंगीत देण्याच्या इराद्याने या कलावंताने चित्रपटगृहामध्ये प्रवेश मिळवला आणि तेथून या माध्यमाशी त्यांचा संबंध जुळून आला. राजा परांजपे यांचा जन्म २४ एप्रिल, १९१० रोजी झाला होता. राजा परांजपे यांचा चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला तो मात्र नट वा साहाय्यक दिग्दर्शक म्हणून नव्हे, तर संगीत विभागात ‘ऑर्गन वादक’ म्हणून! राजाभाऊंना लहानपणपासून संगीताचं वेड होतं. हा वारसा त्यांना त्यांच्या आईकडून लाभला. विद्यार्थीदशेतच ‘भारत गायन समाजा’च्या कै. बापूराव केतकरांनी त्यांच्या संगीतवेडाला चांगलं वळण दिलं. नवनवी नाटके आणि सिनेमा बघण्याचे वेड त्यांना लागले. पण, रोज रोज नाटक, सिनेमा पाहायचं म्हटलं तर पैशाची चणचण त्यांना भासू लागली. पण, त्यासाठी त्यांच्या संगीतवेडातूनच त्यांना एक नवीन मार्ग सापडला. राजा परांजपे यांची अभिनयातील समज पाहून तिथेच त्यांना ‘लपंडाव’ या नाटकात अचानक संधी मिळाली. त्या संधीचे त्यांनी चीज केले. पुढे केशवराव दात्ये यांनीच त्यांना ‘सावकारी पाश’ या चित्रपटातील भूमिका मिळवून दिली. त्यानंतर ते भालजी पेंढारकर यांच्याकडे साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करू लागले. भालजींच्याच काही चित्रपटांत त्यांनी अभिनयही केला. ‘सावकारी पाश’मधील भूमिकेनंतर ते छोटी-मोठी कामे करत होते. पण, खर्‍या अर्थाने ते दिग्दर्शक झाले ते १९४८ मध्ये ‘बलिदान’च्या माध्यमातून.

राजा परांजपे यांनी दिग्दर्शन केले आणि ज्यामध्ये त्यांनी स्वतः काम केले अशा ‘हा माझा मार्ग एकला’ या चित्रपटाची सगळीकडेच वाहवा झाली, त्याचबरोबर या चित्रपटाला राष्ट्रपतींचे सुवर्णपदकही मिळाले होते. अर्थात, हा बहुमान त्यांना दोनदा मिळाला होता. ‘पाठलाग’ या रहस्यप्रधान चित्रपटालाही राष्ट्रपतींचा पुरस्कार मिळाला होता. हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत मैलाचा दगड मानला जातो. त्याचबरोबर या चित्रपटाचे यश पाहून हिंदीमध्येही त्याचा रीमेक केला गेला.

व्यक्तिगत आणि सामाजिक मूल्ये हे परांजपे यांच्या चित्रपटातील बलस्थान असे. त्यांनी इतर दिग्दर्शकांबरोबर केलेल्या चित्रपटांतूनही ही गोष्ट आवर्जून असे. परांजपे यांना आपली संस्कृती, कुटुंबपद्धती, समाज याबद्दल प्रचंड आदर होता आणि तो त्यांच्या चित्रपटांतून प्रतिबिंबित होत असे. त्यांच्या पात्रांमधील संवाद हा बहुधा ओघवते संभाषण वाटे. त्यामुळे त्यातून एका क्षणाला हासू तर दुसर्‍या क्षणाला आसू, असेही होऊ शके. एक यशस्वी चित्रकर्ता म्हणून कारकिर्द असलेल्या राजा परांजपे यांना प्रेक्षक आणि समीक्षक यांनी भरभरून दाद दिली. केवळ मराठीच नव्हे, तर इंग्रजी वृत्तपत्रांतूनही त्यांच्याबद्दल रकानेच्या रकाने भरून मजकूर प्रसिद्ध होत असे. आपल्या चित्रपट कारकिर्दीमध्ये राजा परांजपे यांनी दोन राष्ट्रीय आणि चार राज्य चित्रपट पुरस्कार प्राप्त केले. एकूण २७ चित्रपटांचे दिग्दर्शन केलेल्या या माणसाचे पाय शेवटपर्यंत जमिनीवर होते.  राजा परांजपे यांचे ९ फेब्रुवारी, १९७९ रोजी निधन झाले.

२००८: कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वाहून घेणारे थोर समाजसेवक डॉ. मुरलीधर देविदास ऊर्फ बाबा आमटे यांचे निधन.

baba-amteबाबा आमटे यांचा जन्म २६ डिसेंबर १९१४ रोजी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे झाला. त्यांचे मूळ नाव मुरलीधर देविदास आमटे. त्यांचे कुटुंब त्या भागातील जमीनदार होते. खानदानी श्रीमंती घराण्यात चालत आलेली होती. त्यांचे बालपण ऐश्वर्यात गेले. बाबा आमटेंना लहानपणी चित्रपट फार आवडायचे. बाबा लहानपणापासून स्वतंत्र विचारांचे होते. त्यांना एक सामाजिक जाण मनात होती. महाविद्यालयीतन दिवसांत बाबा आमटेंनी भारताची परिक्रमा केली. रवींद्रनाथ टागोरांच्या संगीत आणि कवितांनी ते अत्यंत प्रभावित झाले. टागोरांसह साने गुरुजींचाही त्यांच्यावर बराच प्रभाव होता. बाबा आमटेंनी वकिलीचे शिक्षण पूर्ण केल्यावर काही काळ वकिलीही केली.  १९४२ च्या सुमारास एकदा बाबा आमटे रेल्वेने वरोड्याला चालले होते. त्यावेळी रेल्वेत काही इंग्रज तरुण शिपाई एका नवविवाहितेची छेड काढत होते. तिचा नवरा घाबरून स्वच्छतागृहात लपून बसला होता. त्यावेळी बाबा पुढे झाले आणि त्यांनी इंग्रजांना थोपवून धरले. गाडी जेव्हा वर्धा स्टेशनात थांबली, तेव्हा बाबा आमटेंनी ती तेथेच अडवून ठेवली. अलोट गर्दी स्थानकावर जमली. त्या सैनिकांच्या तुकडीचा कमांडिंग ऑफिसर तेथे आला आणि त्याने चौकशी करण्याचे वचन दिले. ही गोष्ट जेव्हा महात्मा गांधीजींना समजली, तेव्हा त्यांनी बाबा आमटेंना 'अभय साधक' अर्थात न्यायासाठी लढणारा निर्भय योद्धा असे नाव दिले.

एकदा फेरफटका मारत असताना त्यांनी एक कुष्ठरोगी पाहिला. हातपाय झटलेले, भर पावसात भिजत असलेला माणूस पाहून बाबा भयभीत झाले. त्या माणसाची बाबा आमटेंनी सेवा, सुश्रुषा केली. मात्र, तो फार काळ जगला नाही. हेच आपल्या जीवनाचे ध्येय असल्याचे बाबांना समजले. आपले उर्वरित आयुष्य कुष्ठरोग्यांसाठी द्यायचे, हाच ध्यास त्यांनी धरला. तत्कालीन समाजात कुष्ठरोग म्हणजे मागील जन्मीच्या पापांचे फळ समजले जात असे. कुष्ठरोग्यांना वाळीत टाकले जात असे. १९५२ मध्ये वरोऱ्याजवळ बाबा आमटेंनी आनंदवनाची स्थापना केली. आव्हानात्मक वृत्तीमुळे कुष्ठरोगासारख्या महाभयंकर रोगाने ग्रस्त झालेल्यांची सेवा करण्याचे अतिकठीण व्रत त्यांनी स्वीकारले. कुष्ठरोग्याची केवळ सुश्रुषा करायची नाही, तर त्याला आत्मनिर्भर करण्याचा दृढ निश्चय त्यांनी केला. महारोगी सेवा समिती या संस्थेच्या माध्यमातून बाबांनी कार्याचा विस्तार केला. केवळ कुष्ठरोग्यांसाठीच नव्हे, तर अंधांसाठी, मूकबधिरांसाठी विशेष शाळा निर्माण केल्या. कुष्ठरोग्यांसाठी उपचार, प्रशिक्षण व पुनर्वसन याकरिता त्यांनी रुग्णालयाची व अन्य प्रकल्पांची स्थापना केली.

रॅमन मॅगसेसे पुरस्कार, डॉ. बाबासाहेब आंतरराष्ट्रीय पुरस्कार, डेमियन डट्टन पुरस्कार, संयुक्त राष्ट्रांचा मानवी हक्क पुरस्कार, आंतरराष्ट्रीय जिराफे पुरस्कार, संयुक्त राष्ट्रांचा रोल ऑफ ऑनर, पर्यावरणासंदर्भातील ग्लोबल ५०० पुरस्कार, पावलोस मार ग्रेगोरियस पुरस्कार, राईट लाइव्हलीहुड ॲवॉर्ड, असे आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी बाबा आमटेंना सन्मानित करण्यात आले असून, पद्मश्री, पद्मविभूषण, अपंग कल्याण पुरस्कार, महाराष्ट्र सरकारचा सावित्रीबाई फुले पुरस्कार, गांधी शांतता पुरस्कार, महाराष्ट्र भूषण पुरस्कार, मध्य प्रदेश सरकारचा इंदिरा गांधी पुरस्कार, पहिला जी. डी. बिर्ला पुरस्कार, महाराष्ट्र सरकारचा दलित मित्र पुरस्कार, राष्ट्रीय भूषण पुरस्कार, जमनालाल बजाज पुरस्कार, एन. डी. दिवाण पुरस्कार, राजा राम मोहनराय पुरस्कार, भरतवास पुरस्कार, जी. डी. बिर्ला पुरस्कार, महाराष्ट्र सरकारचा आदिवासी सेवक पुरस्कार, कुमार गंधर्व पुरस्कार, जस्टिस के. एस. हेगडे पुरस्कार, डी. लिट - नागपूर विद्यापीठ, डी. लिट. - पुणे विद्यापीठ, देशिकोत्तम (सन्मानीय डॉक्टरेट), विश्वभारती पुरस्कार, अशा भारतीय पुरस्कारांनी बाबा आमटे यांना गौरविण्यात आले. ९ फेब्रुवारी २००८ रोजी बाबा आमटे यांचे निधन झाले.

संदर्भ

https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%86%E0%A4%88

https://weeklysadhana.in/view_article/shanta-gokhale-on-her-experience-of-translating-shyamchi-aai

https://maharashtratimes.com/sahir-poet/articleshow/30066690.cms

https://www.mahamtb.com/Encyc/2021/2/20/article-on-raja-paranjpe-.amp.html

https://maharashtratimes.com/astro/religion-festival-news/death-anniversary-of-baba-amte-who-did-rehabilitation-and-empowerment-of-people-suffering-from-leprosy/articleshow/74041259.cms