Menu
Log in


Log in


इतिहासात १० फेब्रुवारी

10 Feb 2022 5:55 AM | Amol Sawarkar (Administrator)

२००१: जयपूर – अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर यांचे निधन.

Mogubai Kurdikar - Vijaya Parrikar Library of Indian Classical Musicकुर्डी (गोवा) येथे जन्म. पाळण्यातळे नाव मोगा. त्यांच्या मातोश्री व गायिका जयश्रीबाई यांचा आवाज गोड असला, तरी व्यासंग करण्याजोगी परिस्थिती नव्हती. मुलीने अभिजात संगीतक्षेत्रात मोठे नाव कमवावे, या तळमळीने त्यांनी खूप धडपड केली. गोव्याच्या निसर्गरम्य परिसरात आणि सोमेश्वर-रवळनाथाच्या देवळात चालणाऱ्या भजनांच्या वातावरणात वाढल्याने मोगूबाईंवर लहान वयातच सुरांचा संस्कार झाला. मोगूबाई नऊ वर्षे वयाच्या असताना जयश्रीबाईनी त्यांच्यासह गोव्याच्याच ‘चंद्रेश्वर भूतनाथ संगीत नाटक मंडळीत’ प्रवेश केला. भक्त ध्रुव, भक्त प्रल्हाद इ. नाटकांमधील मोगूबाईंची कामे व गाणी त्याकाळी गाजली. बाळकृष्ण पर्वतकर यांनी त्यांना शास्त्रीय संगीताचे सुरुवातीचे धडे दिले. परिणामी मोगूबाईच्या अंगभूत लय-ताल गुणांना प्रोत्साहन मिळून त्यांत त्यांनी पुढे असामान्य प्रावीण्य मिळविले. मोगूबाईंची घरची स्थिती हलाखीची होती. त्यातच वयाच्या दहाव्या वर्षी आईचे छत्रही नाहीसे झाले. १९१७ ते १९१९ या काळात मोगूबाई ‘सातारकर स्त्री नाटक मंडळी’त गेल्या. तिथे ‘शारदा’ , ‘सुभद्रा’, ‘किंकिणी’ अशा यशस्वी भूमिका त्यांनी केल्या. १९१९ मध्ये मोगूबाई सांगलीत आल्या. ‘माडिवरी चल ग गडे’ हे पद त्या गात असता घरावरून जाणाऱ्या अल्लादियाखाँसाहेबांनी योगायोगाने ते ऐकले. मोगूबाईंची त्या वयातील गाण्याची तयारी व समज पाहून त्यांनी आपणहून त्यांना तालीम सुरू केली. १९२१ मध्ये खाँसाहेब मुंबईस आले. मोगूबाईही तालमीसाठी मुंबईस आल्या. नंतर आग्रा घराण्याचे बशीरखाँ व विलायत हुसेनखाँ यांची त्यांनी तालीम घेतली. १९२७ ते १९३२ या काळात अल्लादियाखाँसाहेबांनीच आपले बंधू हैदरखाँ यांची तालीम मोगूबाईंना देवविली. अल्लादियाखाँसाहेबांनी १९३४ मध्ये गंडाबंधन करून मोगबाईंना तालीम सुरू केली, ती खाँसाहेबांच्या मृत्यूपर्यंत (१९४६), मोगूबाईंच्या कठोर गानसाधनेमुळेच त्यांना रसिकांकडून ‘गान तपस्विनी’ ही सन्मान्य उपाधी मिळाली.

मोगूबाईंच्या सावनी नट, जयतकल्याण, शुद्ध नट, बसंत बहार, भूप नट, संपूर्ण मालकंस अशा अनवट रागांतून द्रुत चिजा बांधल्या आहेत त्या त्यांचा सर्जनशीलतेच्या निदर्शक आहेत. स्वतः आयुष्य भर केवळ ख्यालगायकीचा पाठपुरावा करत असतानाही त्यांनी ठुमरी, भजन आदी उपशास्त्रीय प्रकारांकडेही रसिक व मर्मग्राही दृष्टीने लक्ष पुरवले.

मोगूबाईंना अनेक मानसन्मान मिळाले : संगीत नाटक अकादमीचे पारितोषिक (१९६८), पद्मभूषण (१९७४), गोव्याच्या अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयात संगीत रिसर्च अकादमीचे पारितोषिक (१९८०) 

संदर्भ

https://vishwakosh.marathi.gov.in/30518/#:~:text=%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88%20%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%20%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88%20%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%20%3A(%E0%A5%A7%E0%A5%AB,%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%80%20(%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BE)%20%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87%20%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE.&text=%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%20%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF%20%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0,%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%9A%20%E0%A4%B8%E0%A5%8C%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE%2C%20%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%20%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%20%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE.