Menu
Log in


Log in


इतिहासात १२ फेब्रुवारी

12 Feb 2022 12:15 AM | Amol Sawarkar (Administrator)

१७४२: बाळाजी जनार्दन भानू उर्फ नाना फडणवीस यांचा जन्म. 

नाना फडणवीस | Nana Fadanvishनाना फडणवीस यांचे मूळ घराणे कोकणातल्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील होते. त्यांचा जन्म साताऱ्याला झाला. बालवयातच नानासाहेब पेशव्यांच्या सान्निध्यात आल्यामुळे त्यांना राज्यकारभाराचे शिक्षण मिळाले. वयाच्या २०व्या वर्षी थोरल्या माधवरावांकडून त्यांना फडणिशीची वस्त्रे मिळाली. एवढे मोठे पद नानांनी आपल्या कर्तृत्वाने आणि मुत्सद्दीपणाने सांभाळले.आपल्या चातुर्याच्या बळावर नानांनी राजकीय घडी बसवलीच होती पण त्यांची कामाची तडफ, त्यांच्या वागण्यातला समतोलपणा या बरोबरच पेशवाई आणि राजसत्तेचा दबदबा आणि दरारासुद्धा त्यांनी वाढवला.

 इंग्रजांचा पाडाव करण्यातही ते यशस्वी झाले.नाना फडणीस यांनी पानिपत प्रत्यक्षात पाहिले होते. बहुदा यातूनच धडा घेऊन मराठेशाहीतील मुत्सद्दी नाना फडणीस यांनी त्यांच्या कारकिर्दीत अखबारनवीस आणि नजरबाज यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढविली. या कारणामुळे नानांना हिंदुस्थानातीलच नाही तर परदेशातीलही बातम्या अत्यंत जलद कळत असत.प्रत्येक ठिकाणच्या "आतल्या" बातम्या मिळविण्यासाठी नानांनी अतिशोधक आणि भेदतत्पर माणसे मिळविली होती. गायकवाड नामक एक मराठा सरदार नानांचा अत्यंत विश्वासातील पटाईत बातमीदार होता. निंबाजी माणकोजी नामक अखबारनवीस निजामाच्या दरबारातील खडान् खडा बातमी नानांना कळवीत असे.कुणबिणी, आचारी, दासी, खोजे, सेवेकरी, दर्जी, विधवा स्त्रिया, न्हावी, ब्राह्मण, पागेदार, सरदार, तेलंग, गोसावी असे कित्येक बातमीदार नानांनी नेमले होते. यांना "नजरबाज" असे म्हणत. हे नजरबाज इतके तेज होते की कित्येकांच्या रोजकीर्दीच्या नोंदीही ते नानांना पाठवत असत.

थोरल्या माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर पेशवाईची विस्कटलेली घडी महादजी शिंद्यांच्या मदतीने त्यांनी पुन्हा रुळावर आणली आणि दक्षिणेतील मराठी सत्तेचे वर्चस्व टिकवून ठेवले, पुण्याचे वैभव वाढवले. सवाई माधवराव पेशव्यांच्या अपघाती निधनानंतर सात-आठ महिने नानांनी तुरुंगवासही भोगला. पुढे आजारपणात १३ मार्च १८०० रोजी त्यांचा अंत झाला.

१७९४: पेशवाईतील मुत्सद्दी महादजी शिंदे यांचे वानवडी येथे निधन.

महादजी शिंदे यांचे नाव मराठ्यांच्या इतिहासात शिवाजी महाराज, संभाजी महाराज, महाराजा रघुजी भोसले यांच्यानंतर महान सेनानी म्हणून घेतले जाते. इंग्रजांकडून मानाने यांना द् ग्रेट मराठा असे म्हटले जाई. पानिपतच्या तिसऱ्या लढाईनंतर यांनी मराठा साम्राज्याला पुन्हा उभारी मिळवून देण्याचे काम केले. पानिपतच्या लढाईतील विनाशानंतर महत्त्वाचे होते की मराठ्यांचे उत्तर भारतावरील वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करणे, १७७० मध्ये महादजीने भरतपूरच्या जाट राजा नवल सिंग याचा पराभव केला व मराठ्यांचे वर्चस्व पुन्हा प्रस्थापित झाले. १७७७ मध्ये पेशव्यांचे कोल्हापूर संस्थानाशी खटके उडाले होते यात महादजीने निर्णायक कामगिरी केली.

पहिल्या इंग्रज मराठा युद्धामध्ये त्यांनी इंग्रजाचा काही लढायांमध्ये निर्णायक पराभव केला व इंग्रजांना तह करण्यास भाग पाडले. त्यामुळे त्यांच्या निधनापर्यंत मराठा साम्राज्याला स्थैर्य लाभले.

१९९८: कवयित्री पद्मा गोळे यांचे निधन. 

शब्दारण्य : जन्मशताब्दी- एका बंडखोर कवयित्रीची!आधुनिक मराठी कवयित्री. ‘पद्मा’ ह्या नावाने काव्यलेखन. पटवर्धन राजघराण्यात तासगाव येथे जन्म. प्राथमिक शिक्षण तासगाव येथे. माध्यमिक शिक्षण पुण्यास. एरंडवणा, पुणे येथील श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महाविद्यालयातून एम्. ए. झाल्या. शालेय जीवनात त्यांना नाट्यलेखनाची विशेष आवड होती. पन्नादाई  हे त्यांचे नाटक वार्षिक संमेलनात सादर केले गेले होते. याशिवाय स्वप्न (१९५५), समिधा (अप्रकाशित) ही दोन पुरुषपात्रविरहित नाटकेही त्यांनी लिहिली. प्रीतिपथावर (१९४७), नीहार (१९५४), स्वप्नजा (१९६२) व आकाशवेडी (१९६८) हे त्यांचे काव्यसंग्रह.

 प्रितिपथावर  ह्या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहावर तांब्यांचा प्रभाव असला, तरी अनुकरणाचा हा टप्पा लवकरच ओलांडून त्यांच्या कवितेने पृथगात्म रूप धारण केले. स्वतःच्या उत्कट अनुभवांशी प्रामाणिक राहिल्याने त्यांची कविता परिपक्व आणि समृद्ध होत गेली. एका संवेदनाशील, अंतर्मुख स्त्रीमनाचे विविध विलोभनीय आविष्कार त्यांच्या कवितेत आढळतात. त्यांच्या रसिक, चिंतनशील आणि स्वप्नदर्शी व्यक्तिमत्त्वाचा प्रत्यय त्यांतून येतो. स्निग्ध सूर, संपन्न निसर्गप्रतिमा आणि शालीन संयम ही त्यांच्या कवितेची काही लक्षणीय वैशिष्ट्ये.स्वप्नजा  या त्यांच्या काव्यसंग्रहाला महाराष्ट्र राज्य शासनाचे प्रथम पारितोषिक मिळाले, तसेच त्यांच्या रायगडावरील एक रात्र व इतर नाटिका  या बालनाट्यांच्या पुस्तकालाही महाराष्ट्र राज्य शासनाचे पारितोषिक मिळाले आहे.

२००१: अभिनेत्री भक्ती बर्वे यांचे निधन.

Birthday Special Bhakti Barve's famous roleभक्ती बर्वे यांचा जन्म सांगली येथे झाला. शाळेत असतानाच सुधा करमरकर यांच्या प्रोडक्शन हाऊससोबत त्या बालनाटकांमध्ये काम करू लागल्या. त्यांनी निवेदिका म्हणून ऑल इंडिया रेडिओवर देखील काम केले. त्यानंतर त्या मुंबई दूरदर्शनला बातम्या देत असत. अजब न्याय वर्तुळाचा या नाटकामुळे त्या प्रकाशझोतात आल्या. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.

पु.ल.देशपांडे यांच्या ती फुलराणी या नाटकातील भक्ती बर्वे यांची प्रमुख भूमिका असे. 'फुलराणी'चे ११११हून अधिक प्रयोग झाले. आई रिटायर होतेय या नाटकात भक्ती बर्वे यांनी साकारलेली आईची भूमिकाही खूप गाजली. या नाटकाचे एकूण ९५० प्रयोग झाले

त्यांनी केवळ मराठी मध्येच नव्हे तर हिंदी आणि गुजराती चित्रपटसृष्टीत देखील काम केले. जाने भी दो यारो या प्रसिद्ध चित्रपटातदेखील त्यांनी नसिरुद्दीन शहा, सतिश शहा, रवी बासवानी यांसारख्या अभिनेत्यांसोबत काम केले होते. त्यांना त्यांच्या अभिनयासाठी अनेक पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले होते.

संदर्भ

https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%AB%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B8

https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%9C%E0%A5%80_%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87

https://vishwakosh.marathi.gov.in/22561/

https://www.lokmat.com/marathi-cinema/due-shafi-inamdars-death-his-wife-actress-bhakti-barve-died-four-years/