१९१६: कवयित्री संजीवनी मराठे यांचा जन्म.
पुण्यामध्ये जन्मलेल्या संजीवनी रामचंद्र मराठे या कवयित्री, गीतकार आणि बालसाहित्यकार म्हणून प्रसिद्ध आहेत. संजीवनी मराठे यांचे शिक्षण पुण्यात झाले. शाळकरी वयातच त्यांनी कविता करावयास सुरुवात केली.
महिला विद्यापीठाच्या जी. ए. व एम्. ए. पदव्या त्यांनी संपादन केल्या. शाळकरी वयातच त्यांनी काव्यलेखनास प्रारंभ केला. या रचनांचा काव्य – संजीवनी ( १९३२ ) हा त्यांचा पहिला संग्रह असला, तरी संजीवनींची रसिकांना खरी ओळख झाली ती राका ( १९३८ ) ह्या संग्रहातून ( काव्य – संजीवनीतील निवडक रचनाही त्यात पुनर्मुद्त केलेली आहे ).त्यानंतरची संजीवनींची कविता संसार ( १९४३ ), छाया ( १९४९ ), चित्रा ( १९५७ ) व चंद्रफूल ( १९५१ ) या कवितासंग्रहांतून प्रकाशित झाली आहे. भावपुष्प ( १९५१ ) व परिमला ( १९५९ ) हे त्यांचे गीतसंग्रह. संजीवनी ( १९७६ ) हा त्यांच्या निवडक कवितेचा संपादित संग्रह. तसेच काही बालगीतसंग्रह व लाडकी लेक ( १९७६ ) ही अनुवादित बालकादंबरिका ह्यांचाही त्यांच्या साहित्यसेवेत समावेश होते.संजीवनींच्या काव्यातून प्रीतीच्या पृथगात्म चित्रणाच्या बरोबरीने सौंदर्यपूजक वृत्ती, सश्रद्धता, वात्सल्यादि स्त्रीसुलभ भाव इत्यादींचा आविष्कारही आढळतो. त्यांचे अनुभवविश्व तसे साधे, व्याप व व्यामिश्रता या दृष्टीनी मर्यादित, असे असले तरी या कवयित्रीने आत्मप्रत्ययाशी व स्वत:च्या काव्यप्रकृतीशी प्रामाणिक राहून निर्मितीतील स्वत्व राखले आहे, हे महत्त्वाचे होय. त्यांच्या अनुभवविश्वाला असलेला निरागसतेचा रंग हे त्याचे एक वेधक वैशिष्ट्य आहे. संजीवनींच्या पुढील काळातील रचनेवर मराठी काव्यातील नवीन प्रवाह, स्थित्यंतरे यांचे बाह्य संस्कार झालेले दिसतात. महाराष्ट्र शासनाने ’बरं का गं आई’, आणि ’हसू बाई हसू’ या कवितासंग्रहांना पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.
२०००: अभिजित कुंटे हा भारताचा चौथा आणि महाराष्ट्राचा दुसरा ग्रॅंडमास्टर बनला.
ग्रँडमास्टर किताब मिळविणारे ते पहिले पुणेकर आणि दुसरे महाराष्ट्रीय बुद्धिबळपटू. बुद्धिबळपटू मृणालिनी कुंटे यांच्या या भावाला बहिणीमुळेच बुद्धिबळाची गोडी लागली. मोहन फडके यांच्या मार्गदर्शनाखाली बुद्धिबळाचे धडे गिरवून, अवघ्या अकराव्या वर्षी त्यांनी बारा वर्षांखालील मुलांच्या गटातील राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा जिंकली. त्यानंतर विविध वयोगटातील सात राष्ट्रीय स्पर्धांमध्ये विजेतेपद, आशियाई, कॉमनवेल्थ आणि जागतिक स्पर्धांमध्ये अनेक पदके त्यांनी मिळविली आहेत. मानाच्या शिवछत्रपती पुरस्कारासह विविध पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.
फक्त खेळाडू म्हणून न चमकता, या खेळाचा प्रसार करण्यात कुंटे यांचे मोलाचे योगदान आहे. प्रशिक्षक म्हणून अनेक खेळाडू घडवितानाच बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन-संघटन, अनेक खेळाडूंशी एकाच वेळी बुद्धिबळ खेळण्याचे उपक्रम, अशा मार्गांनी अनेक विद्यार्थ्यांना या खेळाची गोडी लावण्यासाठी ते प्रयत्नशील राहिले आहेत. पुण्यासारख्या शहरात गेल्या काही वर्षांत बुद्धिबळ संस्कृती निर्माण करण्यात कुंटे यांचा महत्त्वाचा वाटा असून, त्यांच्या यशातून अनेक युवा बुद्धिबळपटूंनी प्रेरणा घेतली आहे.
ऑलिम्पियाडमध्ये चार वेळा भारताचे प्रतिनिधित्व करणारा कुंटे याला २०००मध्ये ग्रँडमास्टरचा किताब मिळाला. भारतीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत दोन सुवर्ण आणि चार कांस्यपदके त्याच्या नावे आहेत. बुद्धिबळाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत दोन, आशियाई स्पर्धेत सात पदके कुंटे याने कमावली आहेत. भारतात हा खेळ आज लोकप्रिय झाला, याचे श्रेय विश्वनाथन आनंद, प्रवीण ठिपसे यांच्याबरोबरच कुंटेलाही द्यावे लागेल.
संदर्भ
https://vishwakosh.marathi.gov.in/28443/
https://www.loksatta.com/mumbai/online-conversation-with-grandmaster-abhijit-kunte-in-sahaj-bolta-bolta-zws-70-2701116/