Menu
Log in


Log in


इतिहासात १२ मार्च

11 Mar 2022 11:37 PM | Amol Sawarkar (Administrator)

१९११: कृष्णाजी प्र. खाडिलकरांच्या संगीत मानापमानाचा पहिला प्रयोग झाला.
Sangeet Manapman By Krushnaji Prabhakar Khandilkar१२ मार्च १९११. ‘मानापमान’चा पहिला प्रयोग जाहीर झाला आणि दुसऱ्याच दिवशी सर्व तिकिटं संपली. काकासाहेब अर्थात कृष्णाजी प्रभाकर खाडिलकरांचं पहिलं संगीत नाटक आणि बालगंधर्वांची भूमिका हा ‘किर्लोस्कर मंडळी’नं साधलेला अपूर्व संयोग होता. नाटकाची जय्यत तयारी झाली होती.

काकासाहेबांच्या कडक शिस्तीत अभिनय आणि गाण्याच्या तालमी उत्तम झाल्या होत्या. नाटक सादर होणार होतं मुंबईत. कंपनीच्या बिऱ्हाडी पाहुण्यांची गर्दी झाली होती. उत्सुकता शिगेला पोहोचली होती. उत्साहाला उधाण आलं होतं. १२ तारीख उजाडण्याची प्रत्येक जण वाट पहात होता; पण अकरा तारखेच्या रात्री बालगंधर्वांची एकुलती एक चिमुकली मुलगी आजारी पडली. इतकी आजारी, की त्या आजारपणातच तिचा मृत्यू झाला. दु:खद निधनवार्ता ऐकून सर्वत्र शोककळा पसरली. 

बारा तारखेला नाटकाचा प्रयोग करण्याऐवजी पुढचा दिवस ठरवावा असा विचार कंपनीनं केला. कंपनीच्या नटांची आणि पाहुण्यांची घोर निराशा झाली. प्रेक्षकांचीही घोर निराशा होणार; पण इलाज नव्हता. नारायणरावांना अर्थात बालगंधर्वांना हे सागितलं, की नाटक पुढं ढकलायचं. त्या वेळी त्यांनी निक्षून सांगितलं, की ‘झालं ते झालं, नाटक रद्द करू नका.’ आपलं दु:ख काळजाच्या कुपीत बंद करून रसिकांसाठी आनंदाची कुपी उघडी करायची असं बालगंधर्वांनी ठरवलं. काळजातलं दु:ख काळजातच लपवलं आणि नाटकाचा प्रयोग सादर झाला.

१९३३: लेखिका कविता विश्वनाथ नरवणे यांचा जन्म.

जेष्ठ मराठी लेखिका कविता नरवणे हे एक भारावून टाकणारे व्यक्तिमत्व होते. कविता विश्वनाथ नरवणे या पूर्वाश्रमींच्या योगिनी वासुदेव तोफखाने. त्यांचे पदव्युत्तर शिक्षणही कोल्हापूर येथेच झाले. 

प्रसिद्ध लेखिका व आवडत्या प्राध्यापिका म्हणून त्या परिचीत होत्या. त्यांनी अनेक दिवाळी अंकात लिखाण केले होते. त्याचे अनेक कथा संग्रह प्रसिद्ध आहेत. विविध साहित्य प्रकारांत त्यांनी लेखन केले होते. ओघवती भाषा आणि सुरेख विश्लेषण ही त्यांच्या लिखाणाची वैशिष्ट्ये होती. सर परशुरामभाऊ महाविद्यालयात प्राध्यापिकेची भूमिका निभावत त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले व १९८९ मध्ये इतिहास विभाग प्रमुख म्हणून स्वेच्छा निवृत्ती घेतली. 

मध्ययुगीन इतिहास  मराठ्यांचा इतिहास असो वा आधुनिक जगाचा इतिहास. कविता नरवणे बाईंचा प्रत्येक तास विध्यार्थांना नवीन शिकवून जायचा. कथासंग्रह, कादंबऱ्या, नाटके अशी एकूण ३५ पुस्तके प्रकाशित करून त्यांनी पुण्यातील साहित्यिक वर्तुळात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यांच्या एका कथासंग्रहाचे, 'जाने-अनजाने' या नावाने हिंदीमध्ये रुपांतर झाले आहे. 

निवृत्तीनंतर काही सामाजिक कार्यातही त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवत सुधारणा घडवून आणण्यासाठी योगदान दिले. इंडियन एक्सप्रेसच्या लोकल ट्रान्सपोर्ट समिती प्रमुख म्हणून काही काळ कार्य करताना सामान्यांच्या या संदर्भातील समस्या व त्या दूर करण्यासाठी सुधारणा त्यांनी इंडियन एक्सप्रेसच्या माध्यमातून संबंधितांपर्यंत पोहोचवल्या. नागरी सेवा मंच, एरंडवणा, पुणे, प्रस्थापित करून त्याची कार्याध्यक्षा म्हणून स्थानिक प्रश्नांना वाचा फोडली. जनता सहकारी बँकेच्या संचालक म्हणूनही त्यांनी सुधारणांचा पाठपुरावा केला.

भाषा-व्यवहार कोशाच्या निमित्ताने नरवणे यांनी फार मोठे कार्य केले, नरवणे यांच्या सोळा भाषांमधील कोशाचे प्रकाशन तत्कालीन पंतप्रधान पं. नेहरू यांनी केले होते. त्याबरोबरच सोळा भाषांमधील म्हणी आणि वाक्प्रचार यासंबंधीही त्यांनी केलेले संशोधन व लेखन महत्त्वपूर्ण होते

१९९३: मुंबई येथे १२ बॉम्बस्फोटांच्या मालिकेत ३०० हून अधिक जण ठार झाले, तर हजारो जखमी झाले.

१८९१: अभिनेते आणि निर्माते नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर यांचा जन्म.

१९१३: भारताचे ५वे उपपंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि महाराष्ट्राचे पहिले मुखमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा जन्म. 

संदर्भ 

https://www.bytesofindia.com/newsdetails?NewsId=4916647597363012148&title=Balgandharv%20-%20Khara%20to%20Prema&SectionId=1002&SectionName=Be%20Positive

https://www.bytesofindia.com/newsdetails?NewsId=5095970705263527289&title=Memorial%20Day%20of%20Senior%20Marathi%20Writer,%20Professor%20Kavita%20Vishwanath%20Narwane&SectionId=5263949971971216241&SectionName=%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%20%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF%20%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80