वसंत पंचमी
वसंत पंचमी म्हणजे ‘माघ शुद्ध पंचमी.
सर्व ऋतूंचा राजा असणार्या वसंत ऋतूच्या आगमनाचा आनंद वसंत पंचमीच्या दिनी साजरी करतात.
वसंत पंचमीच्या दिवशी नवीन पिकांच्या लोंब्या आणून त्या घरातील देवतेला अर्पण करून नवान्न ग्रहण करतात.
कामदेव मदनाचा जन्म याच दिवशी झाला, असे म्हटले आहे. दांपत्यजीवन सुखाचे जावे, यासाठी लोक रतिमदनाची पूजा आणि प्रार्थना या दिवशी करतात.
वसंत पंचमी या तिथीला सरस्वतीदेवी उत्पन्न झाली म्हणून तिची पूजा करतात, तसेच लक्ष्मीचाही हा जन्मदिन मानला जातो. म्हणून या तिथीला ‘श्रीपंचमी’ असेही म्हणतात.
वसंतपंचमीपासून फाल्गुन पौर्णिमेपर्यंत वसंतोत्सव साजरा करतात. वसंत ॠतूच्या आगमनाप्रीत्यर्थ सुवसंतक, वसंतोत्सव, मदनोत्सव, अशोकोत्सव वगैरे उत्सव करण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आली आहे. या निमित्ताने नृत्य, संगीत, वनविहार, जलक्रीडा इ. मनोरंजनात्मक कार्यक्रम केले जात.
रंगीबेरंगी वस्त्रे परिधान करून, रंग व गुलाल उडवून हा वसंतोत्सव साजरा करण्याची प्रथा हि काही ठिकाणी आढळते. वसंत ॠतूमध्ये वृक्षलतांना नवी पालवी फुटते. त्या पानाफुलांनी बहरतात. त्याप्रमाणेच लोकांच्या मनोवृत्तीही उत्साही व आनंदी होऊ लागतात. हा उत्सव ह्या संक्रमणस्थितीचा द्योतक आहे. सृष्टीतील नवचैतन्य आणि नवनिर्मितीचा आनंद मानवी जीवनातही खेळावा म्हणून वसंतोत्सव उत्साहात साजरा केला जातो.
दक्षिण भारतापेक्षा उत्तर भारतामध्ये या सणाला विशेष महत्त्व आहे. राजस्थानमधील रजपुतांमध्ये हा उत्सव विविध प्रकारे उत्साहाने साजरा केला जातो. समाजातील सर्व थरांतील लोक यामध्ये सहभागी होतात. रथसप्तमीच्या ( राजस्थानातील ‘भानुसप्तमी’ ) दिवशी सूर्याची पूजा करून त्याच्या रथाची मिरवणूक काढण्यात येते. हा वसंतोत्सवाचाच एक भाग आहे. फाल्गुन महिन्यातील वसंतोत्सव ‘ फाग ’ ह्या नावाने ओळखला जातो. फाल्गुन पोर्णिमेला वसंतोत्सव समाप्त होतो.
माहिती व संकलन
प्रिया आपटे