सर्वांना सर्व प्रथम आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या हार्दिक शुभेच्छा :-) आज वरील फोटो टाकताना गेली ५-६ वर्ष डोळ्या समोर तरळून गेली म्हणून हे मनोगत.
जे आपल्या आरोग्यासाठी अगोदरपासूनच व्यायाम करत आहेत सर्व प्रथम त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि त्यांचा व्यायाम तसाच सुरु राहावा अशी सदिच्छा :-) त्यांनी पुढचा कंटाळवाणा लेख नाही वाचलात तरी चालेल :-)
हळूहळू आयुष्यभरात कधीही व्यायाम न केल्याचे परिणाम दिसायला चालू झाले होते. कधी कंबर नाहीतर पाठ दुखत असे तर कधी मान. थोडक्यात शरीर धोक्याच्या घंटा वाजवू लागले होते :-) त्याच दरम्यान पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जाहीर झाला . त्या निमित्ताने झुरिक मध्ये योगासनांच एक तासाचं शिबीर होणार होते. म्हंटलं चला योगासनातले काही शिकायला मिळेल वाटले म्हणून गेलो. १२ सूर्य नमस्कार घालायचे होते. पण पाठीत ४-५ सूर्य नमस्कारानंतरच उसण भरली :-) म्हंटल सूर्यनमस्कार आपला प्रांत नव्हे म्हणून मग साधेच काही व्यायाम चालू केले. पण त्याचा काही अपायही होत नव्हता आणि उपायही :-) पण पाठीतल्या लागोपाठच्या उसणींमधले अंतर मात्र हळू हळू कमी होत होते. त्यात एकदा गाऊटचा हि त्रास झाल्याचे आठवते. एकदा मात्र अशी काही पाठ धरली की मुलांबरोबर फिरायला हि जाऊ शकलो नाही. तेंव्हा बेडवर पडलो असताना विचार केला कि माझे आजी आजोबा ८० वर्षांपर्यंत जगले. आई बाबा हि ८० च्या पुढे मागे आहेत . म्हणजे अशी बरीच शक्यता आहे कि मी हि बहुतेक ८० वर्षे पूर्ण करेन. पण तो पर्यंत अश्या वेदनेसह आयुष्य जगायचे हा विचार करूनच धडकी भरली. काहीतरी करायला हवे हे तर नक्की होते पण काय ते समजत नव्हते :-) त्यामुळे स्टँडिंग डेस्क, थोडेफार चालणे वगैरे हेच चालू होते पण नियमितता कशातच न्हवती आणि तेच कुठून कधी काय दुखेल हे हि सांगता येत नव्हते :-) आणि काय करायचे हे शोधायला लागले तर हेच कळे कि व्यायाम असा हवा जो आयुष्यभर करता येईल . बहुतेकवेळा हा शोध पुन्हा सूर्यनमस्कार आणि योगासनांपाशीच संपत होता जिथे माझे हात आधीच पोळले होते :-)
तेंव्हा तीन वर्षांपूर्वी पुन्हा योगदिवसाच्या निमित्ताने एका जुन्या मित्राने तो करत असलेल्या योगासनांचे फोटो टाकले. ते पाहताच वाटले कि तो जर करू शकत असेल तर आपणही का प्रयत्न करू नये? मग पुन्हा सूर्यनमस्कारांबाबत माहिती गोळा करण्याचे सुरु केली . ती गोळा करता करत हे हि समजले कि सूर्यनमस्कार पाठी साठी चांगले असले तरी त्यासाठी पाठीच्या स्नायूंमध्ये थोडीतरी मजबुती असणे गरजेचे आहे नाहीतर त्याचा अपायच होईल. मग आधी पाठीचे स्नायू मजबूत करायचे व्यायाम २-३ महिने केले . तो पर्यंत व्यवस्थित सूर्य नमस्कार कसे घालायचे याचा अभ्यास केला :-) आणि मग मार्च २०१९ पासून सूर्यनमस्काराचा व्यायाम चालू केला . सुरवातीला फक्त २ सूर्य नमस्कारांपासून सुरवात करून हळू हळू ३-४ आठवड्यानि २-२ सूर्य नमस्कार वाढवले . जशी प्रॅक्टिस वाढली तसे सूर्य नमस्कार हा एक परिपूर्ण व्यायाम प्रकार का आहे तेही समजू लागले. साधारण १२ सूर्यनमस्कार घालायला यायला लागले तेंव्हाच बाकीच्या सोप्या आसनांकडे बघायला सुरवात केली
हे सर्व करतांना असेही लक्षात आले कि आपण अतिआत्मविश्वास दाखवला तर योगाभ्यास त्याची शिक्षा दुखापतींच्या स्वरूपात लगेचच देतो . त्यावेळी गपचूप ४-५ दिवस काही ना करता पुन्हा प्रयत्न करत रहाणे हेच आपल्या हातात असते. प्रयन्त सोडून न देता चालू ठेवल्यास दिवसेंदिवस फ्लेक्सिबिलिटीत पडणारा फरक जाणवतो हे हि नक्की. या प्रवासात फक्त एकाच खंत म्हणजे योगाभ्यासाशी ओळख मी आधीच करून घ्यायला हवी होती . आता झाली हे हि नसे थोडके . अजून बरेच काही शिकायचे आहे आणि ते शिकायला मिळेल अशी अशा आहे :-) पूर्वी मी ज्या अवस्थेतून गेलो त्यातून कदाचित तुमच्यापैकी काही लोक आज जात असतील , त्यांना एवढेच सांगू इच्छितो कि जे माझ्यासारख्या अतिसामान्य माणसाला जमले ते तुम्हाला तर नक्कीच जमेल :-) मात्र काही शारिरीक व्याधी असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या
आता मला आधी सांगितलेल्या कुठल्याच वेदना सध्यातरी होत नाहीत. पुढे झाल्याचं तर याचे समाधान नक्की असेल कि त्या थांबवण्यासाठी प्रयत्न मात्र नक्कीच केला :-)
असे म्हणतात कि कुठल्याही विचारांचे रूपांतर लगेच क्रियेत फार कमी वेळा होते . एखादा विचार मनात येतो आणि तो योग्य आहे कि नाही हे ठरवणारे अनेक विचार पुन्हा आपल्या मनात येतात आणि मग आपण योग्य पडताळणी करून त्याचे कृतीत रूपांतर करतो. हे लिखाण तुमच्या मनात व्यायामाचा विचार रुजवो आणि विचार आधीच रुजला असल्यास तो पक्का करण्यास मदत करो अशी ईश्वर चरणी प्रार्थना :-) धन्यवाद
श्रीपाद छत्रे
२१/०६/२०२१