Menu
Log in


Log in


तुला गुन्हा अक्षम्य? - २१ मार्च २०२२ - डॉ श्रीपाद जोशी

21 Mar 2022 6:44 AM | Amol Sawarkar (Administrator)

दऱ्या खोरे

जळत होते

पडत होते

काळे

सुरू होते

अग्निहोत्र

पसरत होते

जाळे

ओढली जात होती

माणसे,स्फोटके अंगाला

बांधून

फोडली जात होती

निष्पापांची फौज

करून माणसे

त्यात ओढली

जात होती

तेंव्हा कुठे

गेला होता

सत्तासुता

तुझा धर्म

एवढे कुकर्म तर

डोळ्यांवर

कातडे ओढून तू

निमूट बघत होतास

हसत होतास

कुत्सितपणे त्यांना

सत्ताधर्मच फक्त

निभवीत होतास

द्रौपदी नागवली जाणे

राजसभेत

हा तर युद्धाचाच

भाग म्हणत होतास

सत्तेच्या प्रेमात आणि

सत्तेसाठी युद्धात

सारे काही म्हणत होतास

क्षम्य

माणसा, तुझ्यातला उफाळून येणे

द्वेषच तेवढा,हवा तेंव्हा,

वाटत नाही का

तुला गुन्हा अक्षम्य?

---श्रीपाद भालचंद्र जोशी