Menu
Log in


Log in


शेवटी माणसेच असतात - २२ मार्च २०२२

22 Mar 2022 5:59 AM | Amol Sawarkar (Administrator)

मरोत कुणीकडचीही

दोन्हींकडची मरतात ती

शेवटी माणसेच

असतात

दोन्हीकडच्यांना

दोन्ही कडे,माय,बाप

बायका,पोरे सारखीच

असतात

दोन्हीकडे ती सारी

सारखीच रडतात

कोसळूनही

सारखीच पडतात

डोळ्यातले

सारखेच असते

पाणी

दोन्हीकडे

रूधिराभिषेक म्हणा,

म्हणा रक्ताचे सडे,युद्ध वाजवत असते नेहमीच

माणसांच्या कातडीचे चौघडे

दोन्हीकडच्या

मरणाऱ्यांनाही

दोन्हीकडे

शहीदच म्हणतात

वेळ येते ज्यांच्यावर

सोडून जाण्याची देश

तेंव्हा दोन्हीकडच्यांनाही

विस्थापितच म्हणतात

सारे काही सारखेच

दोन्हीकडे असते,दोन्हीकडे

तरी मग

मैत्र का नसते?

कोण असते शत्रू नेमके

कोणाचे,दोन्हीकडे

कोण ठरवतो घरबसल्या

हे दोन्हीकडे

कधी गळ्यात गळा,

फुलांच्या माळा

कधी स्फोट,विस्फोट

घरादारांच्या होळ्या

कोण चालवतो

कुठे बसून

कोणाच्या खांद्यावरून

गोळ्या

खांद्याला का लावून

घेत नाहीत ते जमिनीवर दोन्हीकडचे खांदे,

आभाळ तर वरचे त्यांना नेहमीच सांधे

---श्रीपाद भालचंद्र जोशी