मी एक अतिअल्पसंख्यांक
मी एक
मतिअल्पसंख्यांक
ज्यांच्याजवळ आहे अति
त्यांची होऊ नये माती म्हणून
त्यांना अधिकाधिक सोयी, सवलती देतच जाणारा अति
ज्यांची भ्रष्ट झाली आहे
अशी मति त्यांच्या प्रकृतीला
आराम पडो म्हणून
प्रार्थना करणारा
मी एक अतिअल्पसंख्यांक
मति ठिकाणावर ठेवून
विचार करणारा
डोळ्यांवर
कातडे ओढण्याचे
समुहादेश
नाकारणारा
समुपदेशन करणारा
अविवेकी पाठशाळांचे
मी एक अतिअल्पसंख्याक
अवशेष, विवेकाच्या पाठशाळांचे
मी एक
अतिअल्पसंख्याक
अजूनही बोलतो शब्द,अर्थ
तळागाळातल्यांचे
सामाजिक न्यायाच्या झालेल्या
ठिकऱ्या गोळा करत फिरतो
सावध असा म्हणतात याच्यापासून हा तर सरळ डोक्यातच शिरतो
मी एक किडा अकल्याणाच्या व्यवस्था पोखरणारा
मी एक कोळी
हे जाळे विस्तारणारा
मी एक म्हणूनच
अतिअल्पसंख्याक
माझ्यावरच आहे संतुष्ट
कृपया मला अनुदानित करू नका
अनुग्रहित तर नकाच नका
माझ्या नावाचे असतीलच
काही लाभ तर
तेही तुम्हीच वाटून घ्या
करायचेच असेल तर
एवढेच करा अशा अतिअल्पसंख्यांकांची
वाढेल संख्या,होतील ते बहुसंख्य याचेच तेवढे प्रयत्न करा
---श्रीपाद भालचंद्र जोशी