उजवे मला उजवा
समजतात
डावे समजतात डावा
तिरपे समजतात
माझे तोंड वाकडे
सरळ होण्यासाठी
घालतात साकडे
मधले समजतात
त्यांच्यातलाच
टाळ्या वाजवायला
शिकवतात
या साऱ्यांपासून
दूरचे मला अधिकच
दूरचा समजतात
कुठे उभा राहून पाहू
मी माझ्याकडे
जिथून पडणार नाही
माझे पाऊल वाकडे
साऱ्याच जागा
सारख्याच निसरड्या
झाल्या आहेत...
---श्रीपाद भालचंद्र जोशी