अशा उभारा तशा उभारा
माणूस असण्याच्याच गुढ्या
माणुसकीच्यासाठी वाहा
प्रेमा प्रेमाच्याच जुड्या
विटलेले ते कुस्करलेले
केलेले ते चोळामोळा
कुठल्याही रंगांचे सारे
करा करा ते ध्वजही गोळा
मिळून सारे एक उभारा
मानवतेची पुनः गुढी
सोडून सारी क्षुद्र क्षुद्रता
माणूस म्हणून घ्या उंच उडी
साऱ्यांचीच असे येथली
मिळून सारी विशाल धरती
विजय म्हणून जो मिळवायाचा
मिळवा मिळवा अपुल्यावरती
---श्रीपाद भालचंद्र जोशी