१९३६: कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचा जन्म.
महाराष्ट्रातील वारकरी कीर्तनकार. ह. भ. प. बाबामहाराज सातारकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे पूर्ण नाव नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे असे आहे. त्यांचा जन्म सातारा येथे झाला. त्यांच्या कुळात १३५ वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा चालू आहे. त्यांचे वडील ज्ञानेश्वर दादामहाराज गोरे हे उत्कृष्ट मृदूंगवादक होते. त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर गोरे यांना संत वाङ्मयाची आवड होती. बाबा महाराज सातारकर यांचे चुलते आप्पामहाराज आणि अण्णामहाराज यांच्याकडून त्यांनी परमार्थाचे धडे घेतले. बाबा महाराजांनी इंग्रजी माध्यमातून एस. एस. सी. पर्यंतचे शिक्षण घेतले. आठव्या वर्षांपासून ते श्री सद्गुरू दादामहाराज यांच्या कीर्तनात अभंगांच्या चाली म्हणत असत.
१९५० ते १९५४ या काळात बाबामहाराज यांनी लाकूड सामानाचा (फर्निचर) व्यवसाय केला. पुढे परमार्थाला वाहून घेण्याचा निश्चय करीत त्यांनी हा व्यवसाय बंद केला. सुमारे १५० वर्षे परमार्थात मग्न असलेल्या सातारकर घराण्यातील बाबा महाराज यांच्याकडे ८० वर्षांपासून श्री. ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात मानकरी ही परंपरा आहे. तुकाराम महाराज पालखी सोहळ्याबरोबर ही मानकरी म्हणून परंपरा सातारकर घराण्याने सुमारे १०० वर्षे राखली आहे.
लोणावळ्यापासून ८ कि. मी. अंतरांवर दुधिवरे येथे १६ एकर जागेत बाबामहाराजांनी आध्यत्मिक केंद्र उभे केले आहे. श्रीमंत नानासाहेब पेशवे धार्मिक आणि आध्यात्मिक पुरस्कार (१९८६), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत नामदेव अध्यासन तर्फे तत्कालीन कुलगुरू श्रीधर गुप्ते यांच्या हस्ते सत्कार (१९९०), पुणे महानगरपालिकेतर्फे मानपत्र (१९९०), सासवड नगरपरिषदेतर्फे सत्कार (१९९०), महाराष्ट्र शासनातर्फे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्याहस्ते मानपत्र (१९९१), सरगम कॅसेट कंपनीद्वारे प्लॅटिनम डिस्क विमोचन आणि तत्कालीन राज्यपाल सी. सुब्रमण्य यांच्या हस्ते सत्कार (१९९२), जागतिक मराठी परिषद दिल्ली यांच्याकडून तत्कालीन राष्ट्रपती डॉ. शंकर दयाळ शर्मा यांच्या हस्ते सत्कार (१९९४) अशा विविध मानपत्रांनी आणि सत्कारांनी त्यांचा सन्मान करण्यात आला.
१९१४: प्राचीन मराठी भाषेचे गाढे व्यासंगी, संत वाङ्मयाचे अभ्यासक व संशोधक, पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख शंकर गोपाळ तथा शं. गो. तुळपुळे यांचा जन्म.
डॉ.शंकर गोपाळ तुळपुळे यांचा जन्म पुणे येथे झाला. एम.ए. पदवी प्राप्त झाल्यावर त्यांनी बेळगाव, धारवाड आणि सोलापूर येथे मराठीचे अध्यापन केले. ‘यादवकालीन मराठी भाषा’ या विषयावरील प्रबंधास त्यांना पीएच.डी. मिळाली. पुणे विद्यापीठात ते मराठी विभाग प्रमुख होते. जर्मनीतील हायडलबर्ग विद्यापीठाचे अभ्यागत प्राध्यापक हा सन्मान त्यांना प्राप्त झाला. प्राचीन मराठी भाषेच्या संदर्भात तुळपुळे यांनी केलेले संशोधन वाङ्मयाच्या इतिहासात अत्यंत मोलाचे ठरते.‘पांच संतकवी’, ‘प्राचीन मराठी गद्य’, ‘प्राचीन मराठी कोरीव लेख’, ‘मराठी ग्रंथनिर्मितीची वाटचाल’, ‘महानुभाव पंथ आणि त्याचे वाङ्मय’, ‘भक्तीचा मळा’, ‘महानुभाव पद्य’, हे ग्रंथ त्यांनी लिहिले. गुरुदेव रानडे उर्फ रा.द.रानडे हे त्यांचे गुरू होते. त्यांच्यासंबंधी त्यांनी ‘गुरुदेव रानडे: चरित्र आणि तत्त्वज्ञान’ हा ग्रंथ लिहिला.‘लीळाचरित्र’, ‘दृष्टान्तपाठ’, ‘ऋद्धिपूरवर्णन’, ‘श्रीकृष्णचरित्र’, ‘मराठी निबंधाची वाटचाल’, ‘माधवस्वामीकृत योगवासिष्ठ’ या ग्रंथाचे टीपा शब्दसंग्रह, प्रस्तावना यांसह संपादन केले. महानुभाव वाङ्मयाचा त्यांचा सखोल अभ्यास होता.
१९२०: आळंदी येथील वारकरी शिक्षणसंस्थेचे संस्थापक, कीर्तनकार, प्रवचनकार आणि लेखक विष्णू नरसिंह जोग यांनी समाधि घेतली.
विष्णू नरसिंह जोग हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे कार्य पद्धतशीरपणे पुढे नेण्याचे प्रयत्न करणारे सत्पुरुष होते. विष्णुबुवा जोग म्हणून हे सर्वपरिचित आहेत. विष्णुबुवांचा जन्म पुण्यात झाला. विष्णुबुवांनाही लहानपणापासून मल्लविद्येचा नाद होता. विष्णुबुवा पुण्यातील नगरकर तालमीचे वस्ताद होते. ते आळंदीतील कीर्तनकार, प्रवचनकार, वारकरी, शिक्षण संस्थेचे संस्थापक आणि लेखक होते. विष्णुपंत जोग हे अत्यंत निरीच्छ असून लोकमान्य टिळक यांचे स्नेही व चहाते होते. ते स्वदेशी वस्तू वापरीत आणि टिळकांना यथाशक्ती मदत करीत.
विष्णुबुवा फारसे शिकलेले नव्हते, पण पांडोबांबरोबर आळंदीला जाऊन जाऊन ते पांडुरंगाचे भक्त झाले. त्यांनी कुठल्याही फडाचा आश्रय न घेता, आळंदीला जाऊन ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवर माळ ठेवून तीच आपल्या गळ्यात घातली व आपण वारकरी झाल्याचे घोषित केले. जोग महाराजांची ही क्रांती त्यांच्याच पाच-दहा शिष्यांपुरती (ज्यांच्यात प्रसिद्ध कादंबरीकार ना. सी. फडकेही होते) मर्यादित राहिली असती, किंवा कदाचित त्यांचाच एक स्वतंत्र फड निर्माण झाला असता; पण आपल्या आयुष्याच्या अखेरच्या पर्वात त्यांनी आळंदीमध्ये वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली व वारकरी संप्रदायाच्या वाढीची क्षमता अमर्याद केली.
विष्णुबुवा अत्यंत नियमशील वारकरी होते. आचरण विशुद्ध, सत्यप्रियता, देशभक्ती अशा अनेक गुणांनी जोगमहाराजांना समाजात मान होता, प्रतिष्ठा होती. अनेकांच्या मनात त्यांच्याविषयी आदराची भावना होती.
संदर्भ
https://marathivishwakosh.org/51794/
https://maharashtranayak.in/taulapaulae-sankara-gaopaala
https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%97
https://prahaar.in/vishnubuva-jog/