करोनाने मला काय दिलं हा संभ्रम निर्माण झाला तेव्हा सकारात्मक किंवा नकारात्मकतेच्या कुंपणाची मर्यादा ठेऊन विचार मांडायची मानसिकता मला मान्य नाही. प्रत्येक व्यक्तीला आलेल्या अनुभवावरून ते मांडण्याचं स्वातंत्र्य त्याला आपसूकच मिळायला हवं..
करोनाने जगाला हादरवून टाकले. धर्म , जात-पात , गरीब - श्रीमंत , स्त्री- पुरूष या चौकटी मोडून काढत सर्व जगात संचार केला. "समय का ये पल थमसा गया है" याचा खरा अर्थ जगाला समजवला. गतीशील, प्रगतीशील देशांना एकच वेसण घालून स्तब्ध केले. नियती , निसर्गकोपापुढे मानवजात किती दुर्बल आहे हे अधोरेखित केले. डार्विनचा ऊक्रांती नियम नव्याने समजला. प्रत्येक प्राणी जगण्यासाठी पर्यावरणाशी जुळवून घेण्याच्या शर्यतीचा एक हिस्सा बनलाय.. जणू बुद्धिबळातील एक प्यादं, ज्याची चालही दुसराच कोणी ठरवत असतो.
या महामारीने मला भविष्याऐवजी वर्तमानात जगण्याचा मंत्र दिला...
आगे भी जाने ना तु....जो भी है बस यही एक पल है या 1965 साली आलेल्या वक़्त चित्रपटातील साहिर लुधियानवी यांच्या गाण्याला माझा मुजरा...आजच्या परिस्थितीत हे गाणं किती चपखल (apt) आहे .या गाण्याच्या नकारात्मकतेमध्ये एक सकारात्मक संदेश आहे तो करोनामुळे उमगला.
जगण्याच्या धडपडीत किंवा परिस्थितीशी जुळवून घेता घेता (याला काहीजणं परिस्थितीशी दोन हात करणे असंही म्हणतात) आपल्या आप्तांना शेवटचंही बघता आलं नाही तरी जगण्याची ऊमेद न सोडण्याची हिम्मत (याला काहीजणं लाचारी म्हणतात) करोनाने दिली.
भविष्यातील planning ला अर्थ नाही ही धमकीवजा समज करोनाने दिली. करोनाने मला संयम शिकवला. ज्या गोष्टींचा मला मानसिक त्रास (पर्यायाने शाररिक) झाला , मुळात त्या गोष्टी बदलण्याचे खरंच माझ्या हातात होतं का हा विचार करायला करोनाने मला भाग पाडले..
एरवी या नश्वर देहाला ज्या भौतिक सुखाची सवय झाली होती त्या सुखांपासून काही काळापुरतं का होईना मला वंचित केले. किंबहुना असे म्हणता येईल की त्या सर्व भौतिक सुखांशिवाय जगण्याचा विश्वास दिला.
अजूनही खुप सार्या गोष्टी सामाजिक , आर्थिक , राजकिय स्तरांवर ढवळून निघाल्या. एक विषाणू जो साध्या साबणाने नष्ट होतो त्या विषाणूने खुप शिकवले..जगाचा नक्षाच पालटून गेला...येणार्या पुढच्या पिढ्या या विषाणू विषयक भरपूर संशोधन करतील. पण मी मात्र या विषाणूचा इतिहास , ऊगम, प्रवास , संहार, अंत या सर्वांची एक अंतर्मुख साक्षीदार होईन ...
बास एवढंच आणि इतकंच....
संध्या कुलकर्णी